भारतीय सैन्यात जम्मू सीमेवर कार्यरत असलेले भद्रावती येथील जवान विनोद रामदास बावणे (३३) कर्तव्यावर असताना मेंदूच्या रक्तस्रावाने बेशुद्ध झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच भद्रावतीत शोककळा पसरली. त्याचे पार्थिव ८ नोव्हेंबरला रात्री १२ वाजेपर्यंत येथे पोहोचणार असून ९ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर मल्हार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येईल. झिंगूजी वार्डातील रहिवासी असलेले मृतविनोद रामदास बावणे २००० मध्ये भारतीय सेनेत दाखल झाले. सध्या ते सीएमपी बटालियनमध्ये रॅन्क हवालदार या पदावर कार्यरत होते. दहा दिवसांपूर्वी जम्मू सीमेवर कर्तव्यावर असताना त्यांचा अचानक रक्तदाब वाढून मेंदूमध्ये रक्तस्राव झाला. त्यात ते बेशुद्ध झाले. त्यांना लगेच उदमपूर येथील मिलिटरी कमांडो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच ६ नाव्हेंबरला रात्री १० वाजून ५ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव विमानाने नागपूर येथे आणण्यात येत असून कामठी मिलिटरी कॅम्पच्या वाहनाने भद्रावती येथे त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येईल. पार्थिवासोबत दोन जवान असून सोबत त्यांची पत्नी आणि मेहुणा आहे. विनोदच्या पश्चात आईवडील, पत्नी, दोन मुले, एक भाऊ, दोन बहिणी व बराच आप्तपरिवार आहे.