नागपूर : ‘ते’ परराज्यातून आले, पण महाराष्ट्रातून त्यांचा पाय निघेना… वर्षाहून अधिक कालावधी लोटला, पण संपूर्ण कुटुंबकबिला येथेच स्थिरावला… येथेच त्यांची वंशावळ देखील वाढीस लागली… छत्तीसगड राज्यातून महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात स्थिरावलेल्या त्यांच्या कळपात आता तर दोन नवजात पिल्लांची भरही पडली….. महाराष्ट्रात रमलेला हा कुटुंबकबिला आहे हत्तींचा… दोन अडीच वर्षांपूर्वी छत्तीसगड राज्यातून २३ हत्तींचा कळप महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाला. तो परतेल असे वाटत असताना गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात त्यांनी बस्तान मांडले. या कळपामुळे जिल्ह्यातील धानशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

आदिवासींच्या हक्काच्या बांबू आणि मोहावर त्यांनी आपला हक्क स्थापित केला. त्या नुकसानीचा मोबदला शेतकऱ्यांना दिला जात आहे, पण या बाहेरुन आलेल्या हत्तीमुळे या परिसरात दहशत मात्र कायम आहे. दरम्यान, या हत्तींवर लक्ष ठेवण्यासाठी पश्चिम बंगालच्या ‘स्टाईप्स अण्ड ग्रीन अर्थ फाऊंडेशन’ची मदत घेतली जात आहे. दरम्यानच्या काळात या कळपातील एका मादीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला तर एक हत्ती कळपापासून वेगळा झाला.

हेही वाचा…दिल्लीवारी हुकलेल्या भावना गवळी म्हणतात, राजश्री पाटील यांना दिल्लीत पाठवा….

छत्तीसगडच्या या हत्तीच्या कळपाचा मुक्काम सध्या गडचिरोली जिल्ह्यातील कोर्ला वनपरिक्षेत्रात आहे. गेल्या आठवड्यातच या कळपात एका पिलाचा जन्म झाला होता. त्यानंतर मंगळवारी रात्री आणखी दोन पिल्लांचा जन्म झाल्याची माहिती गडचिरोली वनखात्यातील एका वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने दिली. गेल्या अडीच वर्षात या कळपात पाच पिल्लांचा जन्म झाला असून आता या कळपात एकूण २६ हत्ती आहेत.