आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिल्पकार नेमणार
नागपुरात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) पहिल्या वर्षांतील काही विषयांचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांशी समन्वय साधून अहवाल सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
येथील हैदराबाद हाऊसमध्ये रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘एम्स’सह नागपूरच्या विविध विकास योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. बैठकीला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. ‘एम्स’चे वर्ग यंदापासून सुरू व्हावे, यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत. ‘एम्स’चा संपूर्ण परिसर तयार होण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो. तोपर्यंत थांबण्याऐवजी पहिल्या वर्षांतील काही अभ्यासक्रम सुरू करता येऊ शकतील काय, यादृष्टीने प्रयत्न करा, असे गडकरी व मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि केंद्रीय मानवसंसाधन मंत्रालयाने ‘एम्स’च्या उभारणीसाठी एक समिती तयार केली आहे, याची माहितीही या बैठकीत देण्यात आली. मिहानमध्ये ‘एम्स’साठी १५० एकर जागा यापूर्वीच देण्यात आली आहे. तेथे परिसर उभारण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिल्पकार नियुक्त करून विकास आराखडा तयार करावा. १६०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून तो संपूर्ण देशात वैशिष्टय़पूर्ण ठरावा. या संपूर्ण प्रक्रियेत काही अडचणी आल्यास त्याची माहिती मला द्यावी. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करून अडचणी दूर करू, असा विश्वासही गडकरी आणि फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिला. या बैठकीत एम्ससह आयआयएम, राष्ट्रीय विधि विद्यापीठ, आयआयटी आदी शैक्षणिक संस्थांच्या उभारणीचाही आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय विधि विद्यापीठासाठी शासकीय जागा देण्यात आली असून इमारतीसाठी १.४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. भविष्यातील विकासासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. राष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक संस्थांची उभारणी करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी, तसेच केंद्र व राज्य शासनाकडे यासंदर्भात पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बैठकीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रमुख वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

‘आयआयएम’चा आराखडा तयार करा
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटसाठी (आयआयएम) मिहानमध्येच २०० एकर जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. येथे संबंधित संस्थेने तातडीने बांधकाम सुरू करावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. सध्या ही संस्था व्हीएनआयटीच्या परिसरात तात्पुरत्या स्वरूपात सुरू आहे. २०१५-१६ च्या पहिल्या तुकडीत ५८ विद्यार्थी आहेत. आयआयएम अहमदाबाद येथील शिक्षकांची नियुक्ती येथे करण्यात आली.

ट्रीपल आयटीसाठी विभाग प्रमुख्यांच्या नियुक्तया
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थेसाठी जागा देण्यात आली आहे. विकासकामांसाठी ४ कोटी रुपये देण्यात आले. बीएसएनएलच्या परिसरात संस्थेचे तात्पुरते काम सुरू असून पहिल्या वर्षांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ९ विभाग प्रमुखांच्या नियुक्तया करण्यात आल्या आहेत. पहिल्या वर्षांसाठी ८० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.

अभियांत्रिक महाविद्यालचा परिसर डिजिटल
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात डिजीटल वर्ग आणि डिजीटल परिसर उभारणीसाठी व्हीएनआयटीचे मार्गदर्शन घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले. व्हीएनआयटी स्वत: त्यांच्या परिसरात इलेक्ट्रॉनिक टेस्टिंग लॅब सुरू करीत असून त्यास शासन सहकार्य करणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.