नागपूर : शाळकरी मुलांना मोबाईलचे व्यसन लागल्यामुळे पालकवर्गात चिंतेचे वातावरण आहे. पालकांनी मुलांना मोबाईल वापरण्यास मनाई  केली तर संतापतात. अशीच एक घटना नागपुरात उघडकीस आली असून पालकांनी मुलाच्या हातून मोबाईल हिसकावल्याने संतापलेल्या मुलाने घरातून पलायन करीत थेट मुंबई गाठली. पोलिसांनी दोन दिवस परिश्रम घेत मुलाचा शोध घेतला. त्याचे समुपदेशन करून त्याला पालकांच्या स्वाधीन केले. ही घटना वाठोड्यात घडली. निशांत सुरेश सहारे असे मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश सहारे हे रिक्षाचालक आहेत. त्यांना दोन मुले असून एक मुलगा दहावीत तर दुसरा आठवीत आहे. पत्नी वैशाली मोलमजुरी करतात. दहावीत उत्तीर्ण झालेल्या निशांतला अकरावीत प्रवेश घ्यायचा होता. त्याला मोबाईलचे व्यसन जडले होते. त्यामुळे त्याला वडिलांनी रागावले व मोबाईल हिसकावून घेण्याची धमकी दिली. तसेच महाविद्यालयात जाऊन अकरावीच्या प्रवेशासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. त्यामुळे संतापून त्याने घरच सोडले. जाताना मोबाईल सोबत घेतला व थेट रेल्वेस्थानक गाठले. मुंबईकडे जाणाऱ्या गाडीत बसून तो मुंबईत पोहचला. तेथे त्याची भटकंती सुरू झाली. दोन दिवस मुंबईत कसेबसे काढले. नवख्या शहरात जेवायची सोय नव्हती. त्यामुळे तो विचलित झाला.

दरम्यान, निशांत बेपत्ता झाल्यामुळे त्याच्या आईने वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी सूत्रे हलवून त्याचा शोध घेतला. मुंबईतून त्याला ताब्यात घेऊन नागपुरात आणले. ठाणेदार आशालता खापरे यांनी त्याचे समुपदेशन केले. त्याला शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले. त्यानंतर त्याला मुलाला पालकांच्या ताब्यात दिले.

मुलांशी संवाद साधा

“किशोरवयीन मुलांमध्ये भावनांची तीव्रता अधिक असते. पालकांचे रागावणे, सूचना देणे, प्रतिबंध घालणे, कोणत्याही गोष्टीत नकार देणे, यामुळे मुले चिडचिड करतात. मनात संतापाची भावना निर्माण होते. त्यामुळे पालकांनी मुलांशी सुसंवाद साधावा, त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे”

प्रा. राजा आकाश (मानसोपचारतज्ज्ञ)