मिरवणुकीत ऐतिहासिक काळ्या, पिवळ्या मारबतींसह स्वतंत्र विदर्भाला विरोध करणाऱ्या व भ्रष्टाचारी नेत्यांचे बडगे

‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवताना स्वतंत्र विदर्भाचे लेखी आश्वासन देणारा बडग्या, सरकारी तिजोरी लुटणारा, हलबा समाजाच्या मागणीला विरोध करणारा, दारूबंदी, विदेशी थेट गुंतवणुकीच्या विरोधात, बोगस शिक्षण संस्था चालवणारे शिक्षण सम्राट, महापालिकेतील आरोग्य विभागातील भ्रष्टाचार आदी विषयांवर तयार करण्यात आलेल्या १४ बडग्यांसह ऐतिहासिक काळ्या, पिवळ्या मारबतींची डीजे आणि ढोल ताशांच्या निनादात शुक्रवारी उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. गेल्या काही दिवसात स्वतंत्र विदर्भाची मागणी जोर धरत असताना या विषयावरील बडग्याचा मिरवणुकीत जास्त प्रभाव दिसून आला. ते या मिरवणुकीचे खास आकर्षण होते. ‘घेऊन जा गे मारबत’, अशा घोषणा देत समाजातील अनिष्टप्रथांचा निषेध करण्यात आला.

विदर्भाचे सांस्कृतिक वैभव आणि परंपरा जपत गेल्या अनेक वषार्ंपासून समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करण्याच्या हेतूने दरवर्षी तान्हा पोळ्याच्या दिवशी निघणाऱ्या ऐतिहासिक काळ्या, पिवळ्या मारबतींसह विविध सामाजिक प्रश्नांवर खास तयार केलेल्या प्रतिकात्मक बडग्यांची मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी उसळली होती. मस्कासाथ, शहीद चौक, टांगा स्टँड, इतवारी, गांधी पुतळा, बडकस चौक, महाल, शिवाजी पुतळा या भागात पाय ठेवायलाही जागा नव्हती. सैराटच्या झिंगझिंगाट गाण्यासह डीजेवर वाजविल्या जाणाऱ्या गीतांवर तरुणाई बेधुंद नाचत होती. यावर्षी छोटे-मोठे १४ बडगे आणि ५ मारबती सहभागी झाल्या होत्या. स्वतंत्र विदर्भाचे लेखी आश्वासन देऊन सत्तेवर आल्यानंतर त्याबाबत चकार न बोलणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अच्छे दिनचे स्वप्न दाखवणाऱ्या केंद्र सरकारचा प्रतिकात्मक बडग्या युवा शक्ती बडग्या उत्सव मंडळाच्यावतीने करण्यात आला होता. मस्कासाथ भागातील छत्रपती बडग्या उत्सव मंडळाच्या वतीने सरकारी खजिना लुटणारा बडग्या म्हणून छगन भुजबळ यांचाही प्रतिकात्मक बडग्या तयार करण्यात आला होता.

विदर्भ क्रांती दल, बाल उत्सव बडग्या उत्सव समिती या मंडळाच्यावतीने हलबा समाजाला मागणीला विरोध करणाऱ्या आणि एफडीच्या विरोधात बडगा निघाला. विदर्भाला विरोध करणाऱ्यांना परत पाठवा, अशा आशयाचा बडगा तेलीपुरातील सार्वजनिक बडग्या उत्सव मंडळाने तयार केला. शिवशक्ती बडग्या उत्सव मंडळाच्यावतीने शिक्षण संस्था सुरू करून धंदा करणाऱ्या शिक्षण सम्राटाचा बडग्या काढण्यात आला.

काळी आणि पिवळी मारबत हे लोकांचे खास आकर्षण होते. शहीद चौकात दोन्ही मारबती एकत्र आल्या त्यावेळी मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. तत्पूर्वी सकाळी तऱ्हाणे तेली समाजतर्फे काढण्यात आलेल्या ऐतिहासिक आणि पारंपरिक अशी १३६ वर्षे जुन्या पिवळ्या मारबतीची व नेहरू पुतळा येथील श्री देवस्थान पंच कमिटीतर्फे काढण्यात आलेल्या १३२ वर्ष झालेल्या काळ्या मारबतीची पूजा करण्यात आली. त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. शहीद चौक, गांधी चौक, बडकस चौक, शिवाजी पुतळा, चिटणीस पार्क, अग्रेसन चौक, जागनाथ बुधवारी, हंसापुरी मार्गे पिवळी नदीवर मारबतींचे विसर्जन करण्यात आले.  मिरवणुकीदरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी मिरवणुकीच्या मार्गावर सकाळी १० वाजतापासून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. मिरवणुकीमुळे महाल आणि इतवारी भागात जाणारी वाहतूक दुपारी १२ वाजतापासून बंद करण्यात आली होती. मासुरकर मार्गावर असलेली गंगाजमुना वस्ती हटविण्यात यावी अशी मागणी करणारा बडग्या तयार करण्यात आला होता. याशिवाय भाजपने बडग्या तयार केला होता. त्याच्यावर कुठलेच नाव नव्हते. त्यामुळे हा बडग्या नेमका कोणाचा हा प्रश्न अनेकांना पडला होता.

स्वतंत्र विदर्भाचे लेखी आश्वासन दिल्यानंतर त्याची पूर्तता न करणारा आणि ‘अच्छे दिनचे स्वप्न दाखवून बुरे दिन बघायला लावणारा प्रतिकात्मक बडग्या युवा शक्ती बडग्या उत्सव समितीच्यावतीने करण्यात आला होता. या बडग्याच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्र सरकारवर टीका करण्यात आली. हा बडग्या गांधी पुतळा चौकात येताच तो खाली पडला असताना कार्यकर्त्यांनी घेऊन जागे मारबत अशा घोषणा देत विदर्भाचे आश्वासन देणाऱ्या नेत्यांचा निषेध केला.

महापालिकेत आरोग्य विभागातील भ्रष्टाचारासोबत रस्त्यावरील खड्डे आणि महापालिकेतील भ्रष्टाचार या विषयावर बडग्या काढण्यात येऊन महापालिकेचा निषेध करण्यात आला. महापालिकेतील आरोग्य विभागाच्या बेदरकार कारभाराचा निषेध करण्यासाठी किशोर समुद्रे यांनी आरोग्य विभागाचा प्रतिकात्मक बडग्या तयार केला होता.