पी.डब्ल्यू.एस. कला व वाणिज्य महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव

विदर्भात येणाऱ्या उद्योगांना अनुरूप ठरतील, असे व्यवसायाभिमुख व तांत्रिक अभ्यासक्रम विद्यापीठांनी तयार करणे व महाविद्यालयातून अभ्यासक्रमाद्वारे प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

पीपल्स वेलफेयर सोसायटी (पी.डब्ल्यू.एस.) नागपूर द्वारा संचालित डॉ. मधुकरराव वासनिक पी.डब्ल्यू. एस. कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. मधुकरराव वासनिक, उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलिंद माने, विधान परिषद सदस्य नागो गाणार प्रामुख्याने उपास्थित होते.

एच.सी.एल. सारख्या नामांकित आय.टी. कंपन्यांनी मिहानमध्ये आतापर्यंत २ हजार युवकांना रोजगार दिला. पुढील २ वर्षांत एच.सी.एल.द्वारे १२ हजार रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. मिहान व बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या उद्योगांना पूरक ठरतील, अशा अभ्यासक्रमांची आखणी करण्यासाठी विद्यापीठ अभ्यास मंडळाच्या  सदस्यांनी सबंधित उद्योजकांशी चर्चा करावी, असे गडकरी यांनी यावेळी सुचवले. नागपूरच्या सिम्बॉयसिस विद्यापीठाद्वारे विदर्भातील मुलांना जागातिक स्तरावरचे शिक्षण मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या सी.एस.आर. निधीतून पीडब्ल्यूएस महाविद्यलयाच्या विद्युतीकरणासाठी सोलर पॅनेल्स उपलब्ध करून देण्याचे आश्वासन गडकरींनी याप्रसंगी दिले.

पश्चिम नागपूरच्या नामांकित कॉलेज इतकेच उत्तर नागपुरातील पी.डब्ल्यू. एस. कॉलेज विद्यार्थ्यांच्या प्रथम पसंतीस उतरल्याने महाविद्यालयाचा लौकिक वाढला, असे माजी महापौर अटलबहादूर सिंग म्हणाले. प्रास्ताविक  प्राचार्य डॉ. यशवंत पाटील यांनी केले. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, नागपूरचे अध्यक्ष भंते नागार्जन सुरई ससाई यांनीही आपले विचार व्यक्त केले. सुवर्ण महोत्सवाप्रसंगी ‘प्रज्ञापथ’ या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाला पी.डब्ल्यू.एस. संस्थेचे पदाधिकारी,  महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी बहुसंख्येने उपास्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. इंद्रजीत ओरके, डॉ. मिथिलेश अवस्थी, डॉ. प्रज्ञा बागडे व इतर शिक्षकांनी सहकार्य केले.