लोकसत्ता टीम

अकोला : विदर्भात तप्त उन्हाची चांगलीच झळ बसत आहे. अकोल्यात सलग तिसऱ्या दिवशी विदर्भातील सर्वाधिक तापमान नोंदवल्या गेले. अकोल्यात सूर्य आग ओकत असून कमाल तापमान ४५.६ अं.से.वर पोहोचले. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. उष्णतेचा धोका लक्षात घेता जिल्हादंडाधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यात ३१ मेपर्यंत कलम १४४ अन्वये जमावबंदी लागू केली आहे. हा आदेश त्यांनी शनिवार निर्गमित केला.

अकोला जिल्ह्यात १९ मेपासून उन्हाचा पारा चढण्यास सुरुवात झाली. सकाळी ८ वाजातपासूनच अकोलेकरांना उन्हाच्या झळा बसत आहेत. दुपारनंतर रस्ते निर्मनुष्य होतात. तापमानाचे नवनवे उच्चांक गाठले जात आहेत. अकोल्यात २२ मे रोजी ४४.८ अं.से.वर तापमान पोहोचले. हवामान विभागाने तापमान आणखी वाढीसह उष्णतेच्या लाटेचा अंदाज व्यक्त केल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून तापमानाने ४५ चा टप्पा ओलांडला आहे. गुरुवारी अकोल्याचे तापमान ४५.५ अं.से.वर गेले. शुक्रवारी त्यात आणखी वाढ होऊन कमाल तापमान ४५.८ अं.से.वर पोहोचले. त्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी विदर्भातील सर्वाधिक ४५.६ अं.से. तापमानाची नोंद अकोल्यात झाली.

आणखी वाचा-रेल्वेने नागपूर, पुण्याकडे येणाचा विचार करताय? मग ‘हे’ वाचाच…

प्रादेशिक हवामान विभागाच्या माहितीनुसार, २५ ते ३१ मेपर्यंत अकोल्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४४ ते ४५.८ अंश सेल्सियसपर्यंत आहे. उष्माघातामुळे सामान्य नागरिक, कामगार, विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी कामगारांना सेवा पुरवणे, खासगी शिकवणी वर्गाच्या वेळेत बदल करणे व अन्य उपाय योजना प्रभावीपणे राबवणे आवश्यक असल्याचे जिल्हादंडाधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे २५ मे रोजीच्या दुपारी ४ पासून ते ३१ मेपर्यंत फौजदारी प्रक्रियात संहिताचे कलम १४४ चे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार औद्योगिक क्षेत्रासह इतर ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांकडून उन्हात काम करून घेता येणार नाही. कामाच्या ठिकाणी उष्माघातापासून संरक्षासाठी पुरेसे शेड तयार करणे, पंखे, कुलर किंवा अन्य साधनांची व्यवस्था, पिण्याचे पुरेसे पाणी व प्रथमोपचार पेटी ठेवणे, याची जबाबदारी संबंधित आस्थापना मालकाची राहणार आहे. याबाबत काही तक्रार असल्यास संबंधित ग्रामपंचायत, महापालिका, नगर परिषद, पोलीस प्रशासन, कामगार कल्याण विभागाकडे तक्रार करता येईल, असे आदेशात नमूद आहे.

आणखी वाचा-बुलढाणा : नागरी क्षेत्रातही पाणीटंचाईची चिन्हे, धरणे तहानली

शिकवणी वर्ग सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत

खासगी शिकवणी वर्गाच्या संचालकांनी सकाळी १० वाजेपर्यंत व सायंकाळी ५ नंतर वर्ग चालवावेत. सकाळी १० ते ५ वेळेत वर्ग सुरू ठेवायचे असल्यास पंखे, कुलर किंवा अन्य साधनांची व्यवस्था करण्याची जाबबदारी संबंधित शिकवणी वर्गाच्या संचालकांची राहणार आहे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.