व्यापाऱ्यांच्या गोदामावर एफडीएचे छापे

उपराजधानीत काही व्यावसायिक कमी वेळात जास्त नफा कमावण्याकरिता निकृष्ट खाद्यतेलाचीही विक्री करत आहेत. नामांकित कंपन्यांचे  बनावट लेबल लावून तेलाची जादा दरात विक्री केली जाते. अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) नेहरू पुतळा येथील मे. न्यू लक्ष्मी ऑईल स्टोअर्स या दुकानावर छापा मारल्यावर हा प्रकार पुढे आला. येथील सर्व तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे.

शहरात काही व्यापारी विविध कंपन्यांचे बनावट लेबल लावून खाद्यतेलाची विक्री करीत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. त्यानुसार  २४ सप्टेंबरला  या विभागाच्या पथकाने मे. लक्ष्मी ऑईल स्टोअर्सच्या प्रतिष्ठानांसह गोदामावर एकाच वेळी छापे घातले. तेथे निकृष्ट दर्जाच्या खाद्यतेलाला दुसऱ्या ब्रँडचे लेबल लावून त्याची विक्री केली जात असल्याचा प्रकार पुढे आला. तातडीने येथील २०८ किलो रिफाईन्ड सोयाबीन तेल (खुले), १२ टिन रिफाईन्ड सोयाबीन तेल (किंग्ज), ४६ टिन रिफाईन्ड सूर्यफूल तेल (आधार) असा सुमारे ९२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले.

या कारवाईमुळे नियम धाब्यावर बसवून बनावटी तेलाची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, या तेलाचे नमुने एफडीएकडून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्याच्या अहवालावरून पुढील कारवाई निश्चित होणार आहे. ही कारवाई सहआयुक्त शशिकांत केकरे, सहाय्यक आयुक्त मिलिंद देशपांडे यांच्या सूचनेवरून अभय देशपांडेंसह त्यांच्या पथकाने केली.