scorecardresearch

चंद्रपूर, गडचिरोलीतील वनक्षेत्रात घट; राज्यासमोरील चिंता वाढली

भारतीय वनसर्वेक्षण अहवाल नुकताच जाहीर झाला. या अहवालात महाराष्ट्रातील अति घनदाट व घनदाट वनक्षेत्रात २०१९च्या तुलनेत अनुक्रमे १३ चौ. किमी आणि १७ चौ. किमीने वाढ झाल्याची नोंद आहे

राज्यासमोरील चिंता वाढली

नागपूर : राज्याच्या वनक्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांनी मागील २०१९च्या तुलनेत २०२१ मध्ये सर्वाधिक वनक्षेत्र गमावल्याने राज्यासमोरची चिंता वाढली आहे. राज्याचे वनक्षेत्रात २० टक्क्यांनी वाढ झाली असली तरीही या दोन जिल्ह्यात वाढीऐवजी मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. 

भारतीय वनसर्वेक्षण अहवाल नुकताच जाहीर झाला. या अहवालात महाराष्ट्रातील अति घनदाट व घनदाट वनक्षेत्रात २०१९च्या तुलनेत अनुक्रमे १३ चौ. किमी आणि १७ चौ. किमीने वाढ झाल्याची नोंद आहे. मात्र, या वाढीचा आनंद साजरा करताना दोन प्रमुख जिल्ह्यांमध्ये कमी झालेल्या वनक्षेत्राकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. कारण, राज्यातील सर्वाधिक वाघांचे आणि वन्यप्राण्यांचे ते आश्रयस्थान आहे. त्यामुळे खाणी किंवा तत्सम प्रकल्पांना वनक्षे़त्र देताना शासनाला गांभिर्याने विचार करावा लागणार आहे. या घनदाट जंगल परिसरात काही प्रकल्प आली आहेत तर काही येण्याच्या तयारीत आहेत. या अहवालानंतर तरी शासनाला जाग येईल, अशी अपेक्षा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, २०१९च्या तुलनेत २०२१ मध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याने सर्वाधिक वनक्षेत्र गमावले असताना गोंदिया आणि बुलढाणा जिल्ह्यातील वनक्षेत्रात मात्र सर्वाधिक वाढ झाली आहे. भारतीय वनसर्वेक्षण अहवालात अति घनदाट, घनदाट आणि वनआच्छादनाच्या वर्गीकरणाअंतर्गत नोंदणीकृत जिल्ह्यांसाठी २०१९च्या तुलनेत झालेली वाढ आणि नुकसानीची नोंद आहे. मात्र, त्याचवेळी अति घनदाट, घनदाट आणि विरळ जंगलासारख्या विविध वनवर्गातील बदलांचा अहवालात स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला नाही. 

जिल्ह्यानुसार परिस्थिती

विदर्भातील गोंदिया, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांनी वनक्षेत्रामध्ये एकूण ७.०२ चौ. किमी, ३.०८ चौ. किमी, २.८६ चौ. किमी, २.३४ चौ. किमी, १.१६ चौ. किमी, ०.३४ चौ. किमीने वाढ नोंदवली आहे तर त्याचवेळी गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा आणि वाशिम या जिल्ह्यांनी अनुक्रमे १४.१२ चौ. किमी, ४.१९ चौ. किमी, १.५९ चौ. किमी आणि ०.३७ चौ. किमीने वनक्षेत्र गमावले  आहे.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Deforestation in chandrapur gadchiroli increased anxiety in the state akp

ताज्या बातम्या