’ कूलर, टाक्या, भांडय़ांमधील पाण्यात डासांच्या अळ्यांचे साम्राज्य!
’ खासगी रुग्णालयांकडून ‘डेंग्यू’ग्रस्तांची लपवा-छपवी
उपराजधानीत ‘डेंग्यू’च्या अळ्यांनी आक्रमण केले आहे. नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाला लक्ष्मीनगर, नेहरूनगर, गांधीबाग, धरमपेठ, हनुमाननगर झोनमध्ये गेल्या महिन्याभरातील निरीक्षणात १,२९६ घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळल्या. सर्वाधिक अळ्या या कूलर, टाके, भांडय़ांतील पाण्यात आढळल्या. महापालिकेकडे केवळ दोन डेंग्यूग्रस्तांची नोंद असल्याने खासगी रुग्णलयांकडून या रुग्णांबाबत लपवा- छपवी सुरू असल्याचे दिसत आहे.
nag01डेंग्यू या आजाराला केंद्र सरकारने अधिसूचित टाकल्यानंतरही नागपुरात डेंग्यूची नोंद होत नसल्याचे चित्र आहे. खासगी रुग्णालयांनी डेंग्यूग्रस्तांची तसेच मृतांची नोंद करणे बंधनकारक आहे. परंतु केंद्र सरकारच्या निर्देशाला हरताळ फासला जात आहे. नागपूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील दहा झोनमध्ये जून महिन्यात तब्बल १ लाख ११ हजार घरांना भेटी दिल्या. यातील १ हजार २९६ घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळल्या. तर गेल्या पंधरा दिवसांत ४१ हजार १६१ घरांपैकी ४७३ घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळल्या. सर्वाधिक अळ्या कूलरमध्ये व त्या खालोखाल पाण्याचे टाके, प्लास्टिकची भांडी, मातीची भांडी, फुलदाणीमध्ये आढळून आल्या.
डेंग्यूंच्या अळ्यांची स्थळे बघता सामान्य नागरिकांमध्ये मोठय़ा प्रमाणात जनजागृतीची गरज आहे. महापालिकेचे खासगी रुग्णालयांवर अजिबात नियंत्रण नाही. खासगी रुग्णालयात किती रुग्ण दगावतात याची नेमकी आकडेवारी नाही. ते कोणत्या आजाराने दगावले याबाबत कोणतीही माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिली जात नाही. अनेक खासगी रुग्णालयांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांवर उपचारही सुरू आहेत. त्या रुग्णांची माहिती महापालिकेला कशी मिळणार? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून अचूक निरीक्षण होत असल्याने डेंग्यूच्या अळ्या आढळणाऱ्या ठिकाणांची संख्या पुढे येत आहे. प्रशासनाकडून डेंग्यू अळ्या नष्ट करण्याकरिता उपाय केले जात असून खासगी रुग्णालयाच्या संपर्कात राहून रुग्णांची माहिती घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.

मेडिकल, मेयोत ‘डेंग्यू’ग्रस्त वाढले
नागपूरच्या मेडिकल व मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत ‘डेंग्यू’चे रुग्ण वाढत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. मेडिकलच्या नोंदीत १६ तर मेयोच्या नोंदीत १० हून जास्त डेंग्यूग्रस्तांची नोंद झाली आहे. मात्र, या नोंदी या दोन्ही संस्थांकडून महापालिकेच्या आरोग्य विभागाला नित्याने दिल्या जात नसल्याची माहिती आहे. या नोंदी संबंधित विभागातील डॉक्टरांकडून येत नसल्याने हा प्रकार घडत आहे.