कर्जत, नागपूर : महायुतीमध्ये एकत्र बसून जागावाटपाची चर्चा केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरमध्ये स्पष्ट केले असतानाच बारामती, शिरूर, रायगड आणि सातारा या गेल्या वेळी जिंकलेल्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी परस्पर जाहीर करून टाकले. बारामती मतदारसंघ लढण्याचे जाहीर करून अजित पवार यांनी काका शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना आव्हानच दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महायुतीत भाजप २६, तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट उर्वरित २२ जागा लढवतील, असे सुतोवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये केले होते. त्यावर शिंदे गट आणि अजित पवार गटात प्रतिक्रिया उमटल्यावर फडणवीस यांनी जागावाटप अद्याप अंतिम झालेले नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, भाजपचा एकूणच सूर फडणवीस यांच्या विधानातून स्पष्ट झाला.

 या पार्श्वभूमीवर कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैचारिक मंथन बैठकीत बोलताना अजित पवार यांनी बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या गेल्या वेळी राष्ट्रवादीने जिंकलेल्या चारही जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असल्याचे जाहीर केले. महायुतीमधील जागावाटप अद्याप अंतिम झालेले नसताना अजित पवार यांनी परस्पर जागावाटपाचे सूत्र जाहीर केले.

हेही वाचा >>>पोषण आहारात अंडी नको! ‘या’ संघटनांचा वाढता विरोध, ‘हे’ सुचविले पर्याय…

२०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला होता. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळीही आम्ही तटस्थ राहून भाजपला मदत केली होती. त्यामुळे आता काही खूप वेगळे केले असे नाही. भिन्न विचारसरणी असलेले पक्ष एकत्र आल्याची देशात अनेक उदाहरणे आहेत. ममता बॅनर्जी, मेहबुबा मुफ्ती, फारूक अब्दुल्ला नितीश कुमार यांनीही भाजपशी युती केली होती. त्यांनी आपल्या पक्षाचा विचार सोडला नाही. आम्हीपण विचार सोडणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

‘जातनिहाय जनगणना व्हावी’

मराठा समाजाला आरक्षण मिळाले, पाहिजे याबाबत दुमत नाही. पण ते देताना इतर कुठल्याही आरक्षणाला धक्का लागायला नको. आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करूनच कार्यवाही व्हायला हवी. मागासवर्ग आयोगाचा अभ्यास, जुने अभिलेख, शिंदे समितीचा अहवाल या सर्व बाजूही महत्त्वाच्या असल्याचे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणना व्हायला हवी. विविध राजकीय पक्षांनी यासंदर्भात आपली भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही आमची चर्चा झाली आहे, असे पवार यांनी सांगितले.

बारामती, सातारा, शिरूर आणि रायगड या चारही जागा निवडून आणण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न आम्ही करणार आहोत. भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार नसलेल्या काही जागा लढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तिन्ही घटक पक्ष बैठक घेऊन याबाबतचा निर्णय घेतील. अतिशय सामोपचाराने जागावाटप होईल.-अजित पवार, उपमुख्यमंत्री

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy chief minister ajit pawar announced that ncp will contest in baramati shirur raigad and satara amy
First published on: 02-12-2023 at 00:14 IST