राज्यात करोनाचा शिरकाव झाल्यापासून अठराही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील ५०० ते ५५०  अस्थायी सहाय्यक प्राध्यापक जीवाची परवा न करता  सेवा देत आहेत. गेल्यावर्षी या तज्ज्ञ डॉक्टरांना वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी स्थायी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्याचा शासनाला विसर पडल्याने ऐन करोना काळात हे संतप्त डॉक्टर २९ एप्रिलपासून सामूहिक रजेवर जाणार असल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.

या डॉक्टरांना वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी गेल्यावर्षी स्थायी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार राज्यभरातून या शिक्षकांची माहितीही मागण्यात आली. मागच्या सरकारच्या काळातही त्यांना स्थायी करण्याचे आश्वासन मिळाले होते. परंतु या आश्वासनाची अंमलबजावणी झाली नाही. या शिक्षकांना कायम केल्यावर शासनावर फारसा आर्थिक भार पडणार नसतानाही तातडीने ही प्रक्रिया होत नसल्याने शिक्षकांनी २९ एप्रिलपासून सामूहिक रजेवर जाण्याची नोटीस राज्यातील सर्व महाविद्यालयातील अधिष्ठात्यांच्या मार्फत शासनाला दिली आहे. दरम्यान, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख सोमवारी नागपुरात आले असता अस्थायी वैद्यकीय शिक्षकांनी त्यांना निवेदन दिले. परंतु त्यांना  लेखी आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे आता या तज्ज्ञ डॉक्टरांनी सामूहिक रजेच्या माध्यमातून आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. त्यातच  राज्यात गंभीर करोनाग्रस्तांची संख्या वाढल्याने सेवेवरील डॉक्टर कमी पडू लागले आहेत. त्यामुळे  करोनाग्रस्तांच्या अडचणी वाढणार आहेत. वैद्यकीय शिक्षण खात्यात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक तसेच सहाय्यक प्राध्यापकांच्या मागील पाच वर्षांपासून ५८३ जागा रिक्त आहेत, हे विशेष.

प्रयत्न सुरू आहेत

शासन अस्थायी वैद्यकीय शिक्षकांच्या बाजूनेच आहे. या विषयावर सामान्य प्रशासन विभागाकडून काही मुद्दे उपस्थित करण्यात आले आहे. त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी लोकसत्ताशी बोलताना दिली होती.

वैद्यकीय शिक्षण खात्याने दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील अठराही शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांत सेवा देणाऱ्या सुमारे ५०० ते ५५० अस्थायी वैद्यकीय शिक्षकांना तातडीने कायम करण्याची गरज आहे. परंतु  शासनाने या सगळ्यांना कंत्राटी संवर्गात टाकल्याने त्यांच्यात संताप आहे. त्यामुळे २९ एप्रिलपासून सामूहिक रजेवर जाणार आहेत. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेचे समर्थन आहे.

– डॉ. समीर गोलावार,

सचिव, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटना.