उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांची स्पष्टोक्ती; न्यायालयाचा आदर म्हणून अंतिम वर्षांच्या परीक्षांना मंजुरी

नागपूर : न्यायालयाचा आदर म्हणून या परीक्षा घेतोय. मात्र, मला आजही कुणी परीक्षेबद्दल विचारल्यास अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द कराव्यात याच मतावर मी  ठाम असल्याचे स्पष्ट मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांच्या तयारीवर घेतलेल्या आढावा बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी सामंत यांनी संवाद साधला. जेईई आणि नीटसारख्या परीक्षा सुरक्षेचे सर्व नियम पाळून नियमित पद्धतीने होत असताना विद्यापीठीय परीक्षांच्या नावावर केवळ औपचारिकता का, असा सवाल केला असता सामंत म्हणाले,  या परीक्षा एका दिवसाच्या असतात. तसेच करोनाचे राज्यातील वाढते संक्रमण बघता अशा काळात विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा आदर म्हणून आम्ही या परीक्षा घेत आहोत. यासाठी चार परीक्षा पद्धतींची निवड केली होती. यातील ऑनलाईन बहूपर्यायी परीक्षा पद्धतीवर सर्वाचे एकमत झाले  आहे.  न्यायालयाने कायद्याचा आधार देत विनापरीक्षा पदवी देणे अवैध असल्याचे सांगितल्यानरंतरही सामंत यांचा आजही परीक्षा रद्दचा सूर कायम असल्याने शैक्षणिक वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आले. राज्यातील करोनाच्या परिस्थितीतही विद्यापीठे परीक्षा घेत असल्याने प्रशासन आणि राज्यसरकारमध्ये समन्वय राहावा, विद्यापीठांना हवी ती मदत करावी म्हणून आपण सर्व विद्यापीठांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन आढावा बैठका घेत असल्याचे  त्यांनी सांगितले.

पदवीला धोका नाही

नागपूर विद्यापीठाने ५० टक्के अंतर्गत गुण हे महाविद्यालयांकडे दिल्याने परीक्षेची केवळ औपचारिकता ठरणार आहे. यामुळे युजीसीच्या नियमांचा भंग होणार असल्याने पदवीला धोका निर्माण होईल, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. मात्र, करोना काळात होणारी परीक्षापद्धत ग्रा धरली जाणार असून विद्यार्थी  भविष्यात कुठेही नोकरीसाठी गेल्यास त्यांच्या पदवीला धोका निर्माण होणार नाही, असे आश्वासन उदय सामंत यांनी दिले.

दीड महिन्यात नापासांचीही परीक्षा

बहुपर्यायी ऑनलाईन परीक्षेसाठी ९० ते ९२ टक्के विद्यार्थी सज्ज आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांची परीक्षा कशा पद्धतीने घ्यावी यावर विचार सुरू आहे. तसेच जे विद्यार्थी या परीक्षेत अनुत्तीर्ण होतील त्यांची येत्या एक ते दीड महिन्यात पुन्हा याच पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी सुरक्षेचा विचार करून सकारात्मकतेने परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहनही सामंत यांनी केले.

शतकोत्तवर वर्षांत सर्वोतोपरी मदत

नागपूर विद्यापीठाला शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यासाठी  सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. परिस्थिती नियंत्रणात येताच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण स्वत: नागपूर विद्यापीठामध्ये घेऊन येऊ व आवश्यक ती  मदत करू, असे आश्वासन सामंत यांनी यावेळी दिले.