कर्मचारी आनंदी- सामान्यांमध्ये नाराजीचे सूर

नागपूर : पाच दिवसांचा आठवडा करावा, अशी अनेक वर्षांची मागणी महाविकास आघाडीने मान्य केल्याने सरकारी कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र या सवलतीतून वगळण्यात आलेल्या सरकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांची मात्र नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे सर्वसामान्य नागरिक व विविध संघटनांनी आता सरकारी कामांना पुन्हा विलंब होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यातील शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय बुधवारी सरकारने घेतला. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाली, पाच दिवसांचा आठवडा झाला असला तरी कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढले आहेत. त्यामुळे दैनंदिन कामांवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे यांनी व्यक्त केली.

सराकारने या निर्णयातून शासकीय रुग्णालये, पाणीपुरवठा प्रकल्प, शैक्षणिक संस्थांसह अत्यावश्यक सेवेत समाविष्ट कार्यालयांना वगळले आहे. या कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

कामे प्रलंबित राहतील

‘‘शासकीय कर्मचाऱ्यांना आतापर्यंत तसाही साडेपाच दिवसांचा आठवडा होता. आपल्याकडे जनतेची बरीच कामे प्रलंबित असतात. आता पाच दिवसांचा आठवडा झाल्याने त्यात अधिक वाढ होईल. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार आहे.’’ – डॉ. संजय देशपांडे, अध्यक्ष, सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन.

शाळांना वगळणे योग्यच

‘‘शिक्षकांना पाच दिवसांचा आठवडा नकोच आहे. शिक्षकांच्या तासिकांचे नियोजन हे आठवडय़ाचे राहते. शनिवारचा दिवस हा विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठीच्या उपक्रमांचा असतो. पाच दिवसांची शाळा केली तर जास्त तासिका घ्याव्या लागतील. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर आणि शिक्षकांवरही होईल. हे

योग्य नाही. इतर कार्यालयांना ठीक आहे. पण शाळांना हे नकोच आहे.’’

– सपन नेहरोत्रा, विभागीय कार्यवाह,शिक्षक भारती. लोकांची कामे गतीने व्हावी

आताही दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी कार्यालये बंदच राहात होती. आता सर्व शनिवारी,  रविवारी बंद राहतील. सरकारच्या निर्णयाचा कर्मचाऱ्यांना फायदा होईल. पण ज्यांच्यासाठी त्यांच्या सेवा आहेत त्या नागरिकांचे काय? त्यांची कामे गतीने व्हावी.

अनिल देशमुख, निवृत्त बँक अधिकारी.चारच दिवस काम होईल

‘‘सामान्य लोकांची कामे होणार नाहीत. कर्मचारी शुक्रवारी दुपारनंतर कार्यालयाबाहेर पडतील आणि सोमवारी कार्यालयात येतील. म्हणजे चारच दिवस काम करतील. याचा फटका कामकाजाला बसेल.’’ – रवि कासखेडीकर, जनाक्रोश. ग्रामीण जनतेला त्रास होईल

सरकारी कर्मचाऱ्यांची मानसिकताच मुळात काम न करण्याची आहे.  म्हणूनच सरकारी काम आणि सहा महिने थांब असे त्यांच्याबाबत बोलले जाते. ग्रामीण भागात शहरातून जाणे-येणे करणारे कर्मचारी चारच दिवस काम करतील. त्याचा फटका ग्रामीण भागातील जनतेला बसेल. – प्रमोद पांडे, अध्यक्ष, जनमंच.