शफी पठाण

एक शेर, दोन मिसरे. पहिल्याचा दुसऱ्यालाही काही थांगपत्ता लागायचा नाही.. पहिला मिसरा नुकताच कानाच्या उंबऱ्याशी थांबलेला. वाटायचे, अरे हा तर ‘इश्क’ मांडतोय. पण, कसले काय? मागून धाडकन दुसरा मिसरा येऊन धडकायचा आणि अर्थस्फोटाने मन-मेंदू नुसते हादरून जायचे. आतापर्यंत डोळ्यापुढे फेर धरणारी ‘इश्क’ची ‘खुमारी’ पार उतरून जायची आणि जातीच्या भिंतीची बोचरी सल हृदयाला पिळ घालायची.. राहत इंदोरींचे हे असे सारेच अकल्पित असायचे. आजही त्यांनी असेच चकवले. ट्विटरवर आयुष्याबाबत भरभरून बोलत राहिले अन् एका हळव्या क्षणी अतिशय बेमालूमपणे मृत्यूचा हात धरून निघूनही गेले.. अगदी त्यांच्या ठेवणीतल्या दुसऱ्या मिसऱ्यासारखे..!

काव्यातून विविध अदांच्या शब्दखुणा पेरणारे प्रख्यात शायर आणि गीतकार राहत इंदोरी यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांना करोनाचीही लागण झाली होती. त्यांना न्यूमोनियासह, हृदयविकार आणि मधुमेहाचाही त्रास होता. मंगळवारी त्यांना दोनदा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांच्या मुलाने दिली.

राहत इंदोरींच्या निधनाने उर्दू शायरीच्या सोनेरी अध्यायाचे एक देखणे पान गळून पडले आहे. शब्दांनाही हेवा वाटावा इतके शब्दातित आयुष्य राहत इंदोरी जगले. काय नव्हते त्यांच्या शायरीत? अदा होती, अंदाज होता आणि आवाजही होता. अदा अशी की  मंचाखालील श्रोते नुसते भ्रमित होऊन ऐकत राहायचे. हा भ्रमही अखेर राहत इंदोरींनाच तोडावा लागायचा. ते म्हणायचे,

मैं आइनों से तो मायूस लौट आया था, मगर किसी ने बताया बहुत हसीं हूँ मैं।

वो जम्र्रे जम्र्रे में मौजूद है मगर मैं भी, कहीं कहीं हूँ कहाँ हूँ कहीं नहीं हूँ मैं।।

पराकोटीची प्रतिभा, हळवे संवेदनशील मन अशा सर्व ऐवजाची श्रीमंती लाभली असतानाही विनम्रतेचे गाठोडे त्यांनी आयुष्यभर प्राणपणाने जपले. १ जानेवारी १९५० मध्ये इंदौरमधील रफतुल्लाह कुरेशी यांच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. कापडाच्या गिरणीत ते काम करायचे. त्यांच्या आईचे नाव मकबूल उन निसा बेगम. इंदोरवर त्यांचे प्रचंड प्रेम होते. येथीलच नूतन विद्यालयात त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे इस्लामिया करिमीया महाविद्यालयातून पदवी आणि बरकतुल्लाह विद्यापीठातून उर्दूमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. उर्दू त्यांचा प्राण होती. त्यांनी आपल्या शायरीत शृंगार जितक्या ताकदीने मांडला तितक्याच शक्तीने अंगारही पेरला. शब्दांचा आधार घेऊन अध्यात्माची आरास मांडली त्याचवेळी जगण्याचे प्रखर तत्त्वज्ञानही सांगितले. इंदोरींनी आपल्या अद्वितीय सादरीकरणाच्या बळावर अनेक मुशायरे जिंकले. भारताची ‘गंगा-जमनी’ तहजीब ते जगभरातील मंचावर सांगत आले. परंतु वर्तमान स्थिती बघून त्यांचे मन प्रचंड व्यथित व्हायचे. धर्माच्या आगीत जळणारी घरे बघून इंदोरी म्हणायचे..

अगर खिलाफ है होने दो जान थोड़ी है, ये सब धुआ है कोई आसमान थोड़ी है..।

लगेगी आग तो आएंगे घर कई जम्द मे, यहा पे सिर्फम् हमारा मकान थोड़ी है..।

कलावंत, पत्रकार, लेखकांना व्यवस्थेकडून विकत घेण्याचा प्रयत्न होतोय असे जाणवल्यावर त्यांची लेखणी कडाडायची..

वो चाहता था कि कासा खम्रीद ले मेरा

मैं उस के ताज की कीमत लगा के लौट आया..

आपल्या शब्दांचा साज सांभाळण्यासाठी इंदोरींनी असे अनेक ताज अक्षरश: धुडकावून लावले. इतकेच नाही त्यांच्या नावावरून त्यांना कोंडीत गाठू पाहणाऱ्यांना त्यांनी खडे बोलही सुनावले. ते कायम म्हणत राहिले..

सभी का खून है शामिल यहां की मिट्टी में

किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है..?

मैं जब मर जाऊं  तो मेरी अलग पहचान लिख देना

लहू से मेरी पेशानी पर हिंदुस्तान लिख देना..

असा हा हिंदुस्तानचा लाडका शायर मंगळवारी कायमचा मौन झाला. पण, त्याचे गरजणारे आणि बरसणारे शब्द मात्र उर्दू शायरीच्या क्षितिजावर लखलखत्या शुक्रासारखे कायम तेजाळत राहतील.