सफाई कर्मचारी नसल्यामुळे स्वच्छताच नाही

लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर : महापालिकेच्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या पाचपावली व्हीएनआयटी  येथील विलगीकरण केंद्रात सफाई कर्मचारी नसल्यामुळे स्वच्छताच होत नाही. परिणामी, विलगीकरणात केंद्रातच करोनाला पोषक वातावरण तयार होत आहे. कोणाकडे तक्रार करावी तर अधिकारी नाही. त्यामुळे  रुग्ण त्रस्त झाले आहेत.

महापौरांनी विलगीकरण केंद्रातील  व्यवस्थेबाबत  प्रशासनाला आदेश दिले असतानाही त्याची अंमलबजावणी केली जात नाही. महापालिकेच्यावतीने  १२ केंद्रांची व्यवस्था असली तरी प्रत्यक्षात केवळ दोनच केंद्रात रुग्णांना ठेवण्यात आले आहे. ७० टक्के रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. गेल्या काही दिवसात करोना रुग्णांचे प्रमाण वाढत असताना हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व वेळेत उपचार मिळावे, यासाठी महापालिकेच्यावतीने ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील करोनाग्रस्तांचा शोध घेत त्यांना पाचपावलीतील विलगीकरणात ठेवले जात आहे.  व्हीएनआयटीमधील केंद्रात बाहेरगावावरून आलेले रुग्ण आहेत. रुग्णांची संख्या दररोज वाढत असली तरी विलगीकरण केंद्रातील संख्या वाढत नाही. पाचपावली येथील विलगीकरणात ७२ रुग्ण असताना तेथील रुग्णांच्या स्वच्छतेविषयी तक्रारी आहेत. तेथील शौचालय साफ नसतात. शिवाय सकाळचा नास्ता उशिरा येतो, अशा तक्रारी आहेत. दोन विंगमध्ये रुग्ण ठेवण्यात आले असताना स्वच्छतागृह स्वच्छ केले जात नाही आणि ते स्वच्छकरण्यासाठी केवळ एकच सफाई कर्मचारी आहे. तोही अनेकदा जागेवर राहत नाही. महापौर दयाशंकर तिवारी यांनी नुकताच त्या ठिकाणी दौरा केला असताना एक सफाई कर्मचारी वाढवून देण्याचे निर्देश दिले मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही.

विलगीकरण केंद्रातील नागरिकांवर वैद्यकीय पथकाद्वारे उपचार करण्यात येत असून स्वच्छतेबाबत लक्ष दिले जात आहे. सध्या दोनच विलगीकरणात रुग्ण असून महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी विलगीकरणातील नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी विशेष काळजी घेत आहे.

– राम जोशी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.