नागपूर : बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राचा राज्यातील अंतर्भागालाही फायदा होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या प्रणालीमुळे १६ ते १९ सप्टेंबर या दरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विदर्भात आज, बुधवारपासून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून नागपूर येथे पावसाला सुरुवात झाली आहे. तर, मराठवाड्यात गुरुवारपासून छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड येथे मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.

हेही वाचा – “यशोमती ठाकूर भाजपमध्ये प्रवेश करणार होत्या,” आमदार रवी राणा यांचा दावा, म्हणाले…

मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, जळगाव, धुळे येथेही गुरुवारपासून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र आज, बुधवारनंतर तीव्र होऊ शकते, असाही अंदाज आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्माण झालेली प्रणाली तीव्र न झाल्याने राज्यात फारसा पाऊस पडला नाही. या काळात जळगाव, मराठवाड्यातील काही भागांमध्ये काही प्रमाणात पाऊस पडला. मात्र अजूनही उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अधिक पावसाची गरज आहे.

सध्या सांगली, सातारा, बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट आहे. या आठवड्यात निर्माण झालेल्या प्रणालीचा फायदा महाराष्ट्राच्या अंतर्भागात होऊ शकतो, असाही अंदाज आहे. ही प्रणाली वायव्येकडे सरकल्यावर त्याचा कोकणातही प्रभाव दिसू शकेल. या आठवड्यात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रानंतरही पुढच्या आठवड्यात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते, मात्र त्याबद्दल या आठवड्याच्या अखेरीस अधिक स्पष्टता येईल, असे भारतीय हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – मराठा आरक्षणासाठी उपोषण मंडपात तरुणाने विष घेतले; उमरखेडमध्ये आंदोलन चिघळले

या क्षेत्राचाही वायव्य दिशेने प्रवास झाल्यास त्याचाही राज्याला फायदा होऊ शकेल. या क्षेत्रामुळे २४ सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता आहे. त्यानंतर कदाचित पावसाचे प्रमाण कमी होईल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rainfall will increase in maharashtra between 16th and 17th september rgc 76 ssb
Show comments