यवतमाळ : उमरखेड येथे गेल्या सात दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषण मंडपात आरक्षणाची मागणी करत एका तरुणाने विष प्राशन केल्याने खळबळ उडाली. ही घटना आज, मंगळवारी दुपारी घडली. अशोक देवराव जाधव (३५, रा. जेवली, ता उमरखेड) असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनास गालबोट लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील आठ दिवसांपासून उमरखेड येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. मराठा समाजाच्यावतीने सचिन घाडगे, शिवाजी पवार, सुदर्शन जाधव, गोपाल कलाने व शरद मगर हे तरूण उपोषणास बसले आहेत. उपोषणाला समर्थन देण्यासाठी तालुक्यातील अनेक गावातील मराठा समाजबांधव व भगिनी दररोज उपोषण मंडपात भेट देत आहेत. आज, मंगळवारी तालुक्यातील बारा, नागापूर, उंचवडद, कुपटी, तिवडी, वाणेगाव, माणकेश्वर, दिवटपिंपरी, देवसरी या गावातील शेकडो समाजबांधव व भगिनी या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी आले. यावेळी उपस्थितांना काही जण मार्गदर्शन करीत असताना तालुक्यातील जेवली येथील अशोक जाधव हा तरुण उपोषणकर्त्यांसोबत बोलण्यासाठी मंडपात गेला व आरक्षणाची मागणी करीत त्याच ठिकाणी बसून त्याने खिशातील कीटकनाशकाची बाटली काढून त्यातील विषारी औषध प्यायले.

हेही वाचा >>> कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध, माळी महासंघाची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा

ही बाब उपोषणकर्ते सचिन घाडगे, समन्वयक प्रमोद देशमुख व शिवाजी वानखेडे यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याच्या हातातील बाटली हिसकावून बाजूला फेकून दिली. मात्र, तोपर्यंत अशोक याने विष प्राशन केले होते. अशोक जाधव याला तत्काळ घटनास्थळावरील रुग्णवाहिकेतून येथील राजाराम प्रभाजी उत्तरवार शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. येथे प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले. अशोक जाधव याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. या घटनेनंतर उपोषणस्थळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला, तर मराठा समाजाने आरक्षणासाठी आता मागे हटणार नाही, असा पवित्रा घेतला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A young man took poison in a hunger strike for maratha reservation umarkhed yavatmal nrp 78 amy
First published on: 12-09-2023 at 19:22 IST