scorecardresearch

उपशमन योजना महामार्गावर शक्य, मात्र रेल्वेमार्गावर अशक्य; अभ्यासकांचे मत; अपघातामुळे होणारे वन्यप्राण्यांचे मृत्यू वाढले

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा काजीपेठ मार्गादरम्यान राजुरा वनक्षेत्रात रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाल्यानंतर महामार्ग आणि रेल्वेमार्गावरील उपशमन योजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

उपशमन योजना महामार्गावर शक्य, मात्र रेल्वेमार्गावर अशक्य; अभ्यासकांचे मत; अपघातामुळे होणारे वन्यप्राण्यांचे मृत्यू वाढले
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी महिला ठार

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा काजीपेठ मार्गादरम्यान राजुरा वनक्षेत्रात रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाल्यानंतर महामार्ग आणि रेल्वेमार्गावरील उपशमन योजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महामार्गावर सहजतेने या योजनांची अंमलबजावणी करणे शक्य असले तरीही रेल्वेमार्गावर ते शक्य नाही. त्यामुळे रेल्वेची गती कमी करणे, हा त्यावरचा पर्याय असल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे म्हणणे आहे.

जंगलशेजारचे महामार्ग तसेच रेल्वेमार्गावर उपशमन योजना करणे आवश्यक आहे. महामार्गावर त्या सहजतेने करता येतात, पण रेल्वेमार्ग तयार झाल्यानंतर व्यावहारिकदृष्टय़ा ते शक्य नाही. गेल्या दहा वर्षांत तंत्रज्ञान व इतर बाबतीत रेल्वे अत्याधुनिक झाल्यामुळे रेल्वेची गती वाढली आहे. मुख्य मार्गावर १०० ते १३० किलोमीटर प्रतितास या वेगाने ती धावते. हे रेल्वेखाते कधीच वन्यप्राण्यांसाठी उपशमन योजना घेत नाहीत. त्यामुळे रेल्वेमार्ग तयार होण्यापूर्वी त्या योजनांची अंमलबजावणी केल्यास आणि रेल्वेची गती कमी केली तरच अपघातामुळे होणारे वन्यप्राण्यांचे मृत्यू रोखता येतील. कन्हाळगाव अभयारण्य व जोगापूर पर्यटन क्षेत्र राजुरा तालुक्यात येते. या व्यस्त रेल्वेमार्गावर कोणत्याही शमन उपाय नाहीत. कन्हाळगावला जोडणारा हा पॅच आहे. ही घटना पहाटेची असून या कालावधीत या मार्गावरून सुमारे २० रेल्वे गेल्या. येथे रेल्वेस्थानक आहे, पण रेल्वे थांबत नाही. त्यामुळे रेल्वेची गती नेहमीच जास्त असते.

रेल्वेमार्ग वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ

बल्लारशा-गोंदिया रेल्वेमार्गही वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. येथेही रेल्वेची गती १०० किलोमीटर प्रतितास असून या मार्गावर वाघ, बिबटय़ासह मोठय़ा प्रमाणावर वन्यप्राण्यांचे मृत्यू झाले आहेत. दोन महिन्यापूर्वीच ११ जूनला या मार्गावर एका चार वर्षांच्या वाघाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला होता. ८ मार्च २०२१ला एक वर्षांचा वाघाचा बछडा मृत्यूमुखी पडला होता. तर १५ नोव्हेंबर २०१८ ला वाघाचे तीन बछडे मृत्युमुखी पडले होते.

रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात बल्लारपूर ते हैदराबाद रेल्वेमार्ग ओलांडणाऱ्या वाघाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, ९ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडली. रेल्वेच्या धडकेत वाघाच्या शरीराचे दोन तुकडे झाले. बुधवारी सकाळी गँगमन रेल्वेरुळाची तपासणी करीत असताना ही बाब उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड, क्षेत्र सहायक नरेंद्र देशकर, वनरक्षक संजय जाधव वनमजुरांसह घटनास्थळी पोहोचले.

चंद्रपूर व्याघ्र जिल्हा असून येथील वनक्षेत्रात वाघांची संख्या वाढत आहे. ही बाब लक्षात घेता व्याघ्र संरक्षणाच्यादृष्टीने जिल्ह्यातील वनक्षेत्रात व्यापक उपाययोजना प्रस्तावित आहे. रेल्वे आणि रस्ते बांधकामादरम्यान वन्यजीव उपशमन योजना वेळोवेळी सुचवण्यात आल्या आहेत. यापूर्वी सुद्धा चांदा फोर्ट-गोंदिया रेल्वेमार्गावर अनेकदा रेल्वे अपघातात वाघाचा व वन्यजीवांचा मृत्यू झालेला आहे. मध्य रेल्वेच्या राजुरा-कागजनगर दरम्यान तिसऱ्या लाईनचे बांधकाम सुरू आहे. यादरम्यान, वाघाच्या भ्रमणमार्गात उपशमन योजना सुचवण्यात आल्या आहेत. वनविभागातर्फे वेळोवेळी दिलेल्या उपाययोजना रेल्वे विभागाने गांभीर्याने घेत कार्यवाही करण्याची गरज आहे.

– बंडू धोतरे, ‘इको प्रो फाऊंडेशन’

मुख्य मार्गावर रेल्वेचा वेग ताशी १३० किलोमीटपर्यंत पोचला आहे. तरीही, रेल्वेच्या बाबतीत शमन उपाय कधीच अंमलात आले नाहीत. जंगलालगतच्या रेल्वेमार्गावरून जाणाऱ्या रेल्वेचा वेग ताशी २५ ते ३० किलोमीटपर्यंत मर्यादित ठेवणे आवश्यक आहे.

– मिलिंद परिवक्कम, ‘लँडस्केप रिसर्च अँड कन्झर्वेशन फाऊंडेशन’

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Highways railways accidental wildlife deaths increased ysh