अमरावती : पत्नीची हत्या करून पसार झालेल्या आरोपी पतीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बडनेरातून अटक केली. हत्येची घटना ४ सप्टेंबर रोजी ब्राह्मणवाडा थडी ठाण्याच्या हद्दीतील घाटलाडकी येथे घडली होती. कचरु सुखराम कास्दे (४८) रा. कावला, मध्यप्रदेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. त्याने पत्नी नितू कचरु कास्दे (४२) रा. कावला, मध्यप्रदेश हिची हत्या केली होती. ब्राह्मणवाडा थडी ठाण्याच्या हद्दीत मजुरीच्या कामाला आलेला कचरु कास्दे हा पत्नी नितू कास्दे यांच्यासोबत ४ सप्टेंबर रोजी घाटलाडकी मार्गे कावला या मूळगावी जात होता. घाटलाडकीसमोरील रस्त्यावर अचानक त्यांच्यात वाद उद्भवला. या वादात कचरुने पत्नीची हत्या केली. त्यानंतर तो पसार झाला होता. हेही वाचा - “मस्तवाल सरकारला आपण सर्व रस्त्यावर उतरल्याशिवाय…”, कंत्राटी भरती, पेपरफुटीवरून राजकीय वातावरण तापले हेही वाचा - कंत्राटी नोकरभरती : सरकार खासगी कंपनीच्या घशात घालणार इतके पैसे, वाचून थक्क व्हाल… या प्रकरणी ब्राह्मणवाडा थडी ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आणि आरोपीचा शोध सुरू करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही त्याच्या मागावर होते. दरम्यान, कचरु हा पत्नी नितू यांच्या अंत्यसंस्कारालाही हजर राहिला नाही. तो गावाकडेसुद्धा फिरकला नाही. अशात तो बडनेरा येथे लपून बसल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर पथकाने बडनेरा गाठून त्याला अटक केली. त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी ब्राह्मणवाडा थडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.