पाच वर्षीय मुलगा दुसऱ्याचा, कुटुंबीयांच्या अत्याचारामुळे मरणाला जवळ केले
मोमिनपुरा-टिमकी हत्याकांडातील मृतांची ओळख पटली आहे. मरणारा युवक हा मुस्लीम असून तरुणी ही हिंदू आहे. पाच वर्षीय मुलगा हा मृत तरुणीच्या मोठय़ा बहिणीचा आहे. कुटुंबीयांच्या अत्याचारामुळे शेवटी मृत्यूला जवळ केले, असे त्यांनी मृत्युपूर्वी लिहून ठेवले असून मोबाईलमधील चलचित्रातूनही ते स्पष्ट होते.
शुक्रवारी तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिमकी येथील बॉम्बे चिकन दुकानाचे मालक मोहम्मद नासिर यांच्या घरी भाडय़ाने राहणाऱ्या महिलेने पती, मुलाचा गळा चिरून खून केला आणि स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेतील मृतांची ओळख पटलेली नव्हती. परंतु त्यांच्या घरातून सापडलेल्या एका रजिस्टरमध्ये त्यांनी सर्व हकिकत लिहून ठेवली होती. याशिवाय मृत्यूपूर्वी त्यांनी मोबाईलमधून व्हीडिओ शूटिंग करून चलचित्र तयार केले होते. यात तिघांचेही बयान आहे. मृत सर्वजण कानपूरचे आहेत.
मोहम्मद अली उर्फ सरवर आलम मोहम्मद हारुण (३५), मनीष उर्फ पिंकी शिवनाथ कुशवाह (२७) दोन्ही रा. शास्त्रीनगर, कानपूर आणि दादू मनोज कुशवाह (५ वष्रे, रा. कानपूर) अशी मृतांची नावे आहेत. अली आणि पिंकीचे घर एकमेकांच्या समोरासमोर आहे. पिंकी ही बी. ए. तृतीय वर्षांपर्यंत शिकलेली होती. मोहम्मद अली हा साडीवर नक्षीकाम करण्याचे काम करायचा. कुटुंबीयांच्या अत्याचाराला कंटाळून १८ जुलै २०१३ ला त्यांनी एकमेकांच्या सोबतीने घर सोडले. दुसऱ्या शहरात भाडय़ाने राहण्यासाठी घर मिळाले आणि लोकांना पती-पती असल्याचा विश्वास बसावा म्हणून पिंकी आपली मोठी बहीण अनिता मनोज कुशवाह हिचा मुलगा दादू हा पिंकीच्या अंगाखांद्यावर खेळणारा होता. त्यामुळे त्यालाही सोबत घेतले. या संदर्भात कानपूर येथील काकादेव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हाही दाखल आहे. त्यानंतर ते थेट नागपुरात दाखल झाले. त्यांची परिस्थिती हलाखीचीच होती. अलीला पाच भाऊ आणि एक बहीण आहे. आईवडीलही जिवंत आहेत. मोठा भाऊ बनावट डॉक्टर आहे. तीन भावांचे लग्न झाले असून एकेकाला जवळपास तीन ते चार बायका आहे. या व्यतिरिक्त त्यांचे अनैतिक संबंधही आहेत.
ही बाब आईवडिलांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी सर्वानी मिळून आपला छळ करणे सुरू केले. या जाचाला कंटाळून समोर राहणाऱ्या पिंकीसोबत आपण पळून जाण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतरही परिस्थिती आपला पिच्छा पुरवत असल्याने मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेतला. यासाठी कुणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये, असे अलीने मृत्यूपूर्वी एका रजिस्टरमध्ये लिहून ठेवले आहे.

बहिणींच्या नवऱ्यांकडून अत्याचार
आपल्याला तीन बहिणी असून त्यांच्या नवऱ्यांनी आपल्यावर बलात्कार केला आहे. यानंतर एका मैत्रिणीच्या नवऱ्यानेही अत्याचार केला. या सर्व प्रकारासंदर्भात आपल्या बहिणींना सांगितले. परंतु त्यांनी आपला आवाज दडपला. कुटुंबीयांकडून वारंवार होणाऱ्या अत्याचाराला कंटाळूनच आपण समोर राहणाऱ्या मोहम्मद अलीसोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. आपल्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये, असे पिंकीने रजिस्टरमध्ये लिहून ठेवले आहे.

मृतदेह स्वीकारण्यासही टाळाटाळ
मोहम्मद अलीने मृत्यूपूर्वी आपल्या मित्राचा मोबाईल क्रमांक रजिस्टरवर लिहून ठेवला आणि पोलिसांना त्याच्याशी संपर्क करण्यास सांगितले. पोलिसांनी घटनास्थळावरून तीन मोबाईल, रजिस्टर आणि इतर साहित्य जप्त केले. या मोबाईलमधून आणि रजिस्टरमधील माहितीवरून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि त्यांना मृतांसंदर्भात माहिती दिली असता त्यांच्याकडून उलटसूलट प्रश्नां विचारण्यात आले. परंतु मृतदेह स्वीकारण्यासाठी केव्हा येताय, यावर कोणतेही उत्तर न देता टाळाटाळ करण्यात आली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली.