चंद्रपूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ करीता जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असून आगामी निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘बुथ लेव्हल मॅनेजमेंट’ चे नियोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले. नियोजन सभागृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी उपस्थित होते. २०१९ च्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण ६४.८४ टक्के मतदान झाले होते, असे सांगून जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, चंद्रपूर शहरात मतदानाची टक्केवारी कमी होती. शहरातील काही मतदान केंद्रावर तर ५० टक्क्यांपेक्षाही कमी मतदान झाले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर प्रशासनाचा भर आहे.

ज्या मतदान केंद्रावर ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले, अशा भागात विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच ‘बुथ लेव्हल मॅनेजमेंट’ अंतर्गत मतदारांना केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. यात उन्हाचा तडाखा बसू नये म्हणून मंडप उभारणे, जेणेकरून मतदारांना सावली मिळेल, पिण्याचे पाणी, प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे. ८५ वर्षांवरील मतदार, गर्भवती माता, स्तनदा माता यांना मतदानासाठी प्राधान्य देण्यात येईल. या मतदारांना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. यासोबतच चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व्यवस्थापित मतदान केंद्र, महिला व्यवस्थापित मतदान केंद्र, युवा मतदान केंद्र, आणि आदर्श मतदान केंद्राचे नियोजन करण्यात येणार आहे. निवडणूक संदर्भात काही संशयास्पद बातमी किंवा व्हीडीओ क्लिप आढळली तर त्याची खात्री करावी व प्रशासनाशी संपर्क करावा. चुकीची बातमी आपल्याकडून जाणार नाही, याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी.

हेही वाचा : वंचितची दुसरी यादी जाहीर; उमेदवारांच्या जातीचाही उल्लेख

निवडणुकीसंदर्भात सर्व परवानग्या मिळण्यासाठी जिल्हास्तरावर तसेच विधानसभा मतदारसंघ स्तरावर ‘एक खिडकी’ कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन परवानगी सुध्दा घेता येणार आहे, असेही जिल्हाधिकारी गौडा यांनी सांगितले. या मतदार संघात एकूण १८ लक्ष ३७ हजार ९०७ मतदार असून यापैकी ९ लक्ष ४५ हजार ७३६ पुरुष मतदार, ८ लक्ष ९२ हजार १२२ स्त्री आणि ४८ इतर मतदार आहेत. मतदान केंद्रांची एकूण संख्या २११८ आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात १८ ते १९ वयोगटातील युवा मतदारांची संख्या २४ हजार ४४३ आहे. तसेच ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले मतदार१६ हजार ४४२ असून दिव्यांग मतदारांची संख्या ९ हजार ६९४ आहे. प्रथमस्तरीय तपासणी अंती २११८ मतदान केंद्रावर २६१० बॅलेट युनीट, २६१० कंट्राल युनीट आणि २८१८ व्हीव्हीपॅटचे वाटप करण्यात आले आहे.

हेही वाचा : ‘नाना पटोलेंचा भाजपमधील नेत्यांसोबत छुपा संबंध,” ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, “त्यांना भाजपविरोधात…”

दबाव व धमकविण्याच्या प्रकाराची तक्रार करा

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या ज्या क्षेत्रात मतदारांवर दबाव टाकणे किंवा धमकाविण्याचे प्रकार निदर्शनास येत असतील, त्याची माहिती त्वरित कळवावी. जेणेकरून अशा क्षेत्रात पोलिसांसह अतिरिक्त मनुष्यबळाचे व्यवस्थापन करता येईल. तसेच धमकाविणा-यांवर कडक कारवाईसुध्दा केली जाईल. निवडणुकीच्या काळात नागरिकांना किंवा अन्य कोणालाही तक्रार करावयाची असल्यास सी-व्हीजील ॲपचा उपयोग करावा. या ॲपवर तक्रार आणि फोटो अपलोड केल्यास १०० मिनिटांमध्ये त्याचे निराकरण करता येते.

निवडणूक निरीक्षक लोकेशकुमार जाटव