गडचिरोली : राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार स्वतःच्या मुलीसाठी उमेदवारी मिळवू शकले नाहीत. गडचिरोलीत डॉ. उसेंडींसाठी सुध्दा त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला. पण, दोन्ही वेळेस पक्षाने त्यांचे ऐकले नाही. यावरून त्यांची पक्षात काय किंमत आहे, हे आपल्या सर्वांना दिसून आले. अशी खोचक टीका राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केली आहे. ११ एप्रिल रोजी मंत्री आत्राम यांनी माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार, असा दावा केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. त्यानंतर वडेट्टीवार यांनी आत्राम यांचा दावा तथ्यहीन असल्याचे सांगून ते भाजपचे गुलाम असल्याची टीका केली.

हेही वाचा : “बटन दाबले आणि समस्या सुटली, असे होत नाही…”, रणजितसिंह निंबाळकरांच्या वक्तव्याने….

गडचिरोली चिमूर लोकसभेच्या प्रचाराची धुरा आपल्या हाती घेऊन वडेट्टीवार संपूर्ण लोकसभा क्षेत्र पिंजून काढत आहेत. यादरम्यान, झालेल्या सभांमधून त्यांनी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. यावर आत्राम यांनी चित्रफीत प्रसिद्ध केली असून यात त्यांनी वडेट्टीवारांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणतात, राज्याचे विरोधी पक्षनेते असलेल्या विजय वडेट्टीवारांची पक्षात काहीही किंमत नाही. ते स्वतःच्या मुलीसाठी उमेदवारी मिळवू शकले नाहीत. डॉ. नामदेव उसेंडी यांना उमेदवारीसाठी दिलेले आश्वासन ते पूर्ण करू शकले नाहीत. म्हणून चंद्रपूर सोडून गडचिरोलीत ते फिरत आहेत. याच नाराजीतून ते मझ्यावर सतत टीका करत सुटले आहेत. आम्ही दोन राजे एकत्र आल्याने अहेरी विधानसभेसह जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांना सर्वाधिक मते मिळतील आणि ते चार लाखांहून अधिक मतांनी निवडून येतील. मोदींच्या काळात आदिवासी, मागास वर्गाच्या कल्याणासाठी सतत कामे सुरू आहेत. त्यांच्याच काळात पहिल्यांदा देशाच्या सर्वोच्चपदी आदिवासी महिलेला संधी देण्यात आली. पण, काँग्रेसचे नेते भाजप घटना बदलणार असा अपप्रचार करीत आहेत. तसे काहीही होणार नसून लोकसभेत महायुतीच्या उमेदवाराला मिळत असलेला पाठिंबा बघून विरोधकांना पोटशूळ उठला आहे. त्यामुळेच ते असे आरोप करत सुटले आहेत, अशी टीका आत्राम यांनी केली आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगला असून पुढे हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.