अहवालाअभावी सामान्य विलगीकरणात अडकतात; संगणकासह डीटीपी ऑपरेटरचा उपयोग काय?

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : करोनाग्रस्तांसह विलगीकरणातील व्यक्तींची अचूक माहिती व्हावी म्हणून प्रशासनाने एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. ते प्रत्येक विलगीकरण केंद्रासह प्रयोगशाळेला उपलब्ध करत नोंदणीसाठी संगणकासह डीटीपी ऑपरेटरही देण्यात आला. परंतु एकाही प्रयोगशाळेचा अहवाल या सॉफ्टवेअरवर अपलोड होत नाही. त्यामुळे करोना नसलेल्या व्यक्तीही जबरीने विलगीकरण केंद्रात अहवालाच्या प्रतीक्षेत अडकून पडतात. यात प्रशासनाची चुक असतानाही त्याची शिक्षा संशयितांना होते.

उपराजधानीत सतरंजीपुरा, मोमिनपुरा, बजाजनगर, अभ्यंकरनगर, खामला, जरीपटका, एम्प्रेस सिटी, भालदारपुरा, शंतिनगर, कुंदनलाल गुप्ता नगर, गिट्टीखदान,कामठी, कन्हान, राजीवनगर, कमाल चौक, टिमकी या भागात करोनाचे रुग्ण आढळलेत. पैकी अनेक भागातील रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. दरम्यान करोना संक्रमन टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने रुग्णाच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संपर्कातील व्यक्तींना तातडीने शहरातील आमदार निवास, रविभवन, वनामती, सिंबॉयसिससह इतरही काही विलगीकरण केंद्रात ठेवले.

दोन्ही अहवाल नकारात्मक आल्यावर संबंधिताला घरी सोडले जाते. जिल्हा प्रशासनाने शहरातील विविध विलगीकरण केंद्र, विविध चाचणी प्रयोगशाळांसह इतर करोनाशी संबंधित यंत्रणांचे अचूक समन्वय व्हावे म्हणून ‘डेमडेड क्रिएशन्स’च्या वतीने एक सॉफ्टवेअर विकसित केले. हे सॉफ्टवेअर संगणकात अपलोड करून शहरातील सर्व विलगीकरण केंद्र आणि प्रयोगशाळांना दिले गेले.  विलगीकरणात व्यक्ती दाखल होताच तेथून या व्यक्तींची नोंद सध्या केली जाते. त्यानंतर या केंद्रातून मेडिकल, मेयो आणि एम्सची चमू नमुने गोळा करून प्रयोगशाळेत नेते. परंतु अद्यापही प्रयोगशाळेतील अहवाल या सॉफ्टवेअरवर टाकले जात नाही. सध्या एम्स आणि मेयोचे अहवाल संबंधित यंत्रणेला मेल आणि व्हॉट्सअ‍ॅपवर पीडीएफ फाईलच्या मदतीने पाठवले जाते. परंतु त्यालाही विलंब होत असल्याने ते बघून संबंधिताला सोडायला कधी-कधी काही दिवसही उजाडतात. त्यामुळे सर्वच विलगीकरण केंद्रात अहवाल येत नसल्याने उपस्थित आरोग्य खात्याच्या डॉक्टरांसह इतरांना विलगीकरणातील सामान्य व्यक्तींच्या रोषाला समोर जावे लागते.

मेयोतील डाटा एन्ट्री ऑपरेटर बेपत्ता

प्रशासनाकडून मेयोच्या प्रयोगशाळेत सॉफ्टवेअर अपलोड करून एक डाटा एन्ट्री ऑपरेटर नोंदी करण्यासाठी देण्यात आला. परंतु दोन दिवस काम केल्यावरही ही ऑपरेटर बेपत्ता झाली. मेयोत करोनाचे रुग्ण वाढत असल्याने भीतीपोटी ती सुट्टीवर गेल्याची अधिकाऱ्यांत चर्चा आहे. अनेकदा तिच्याशी संबंधित यंत्रणेने संपर्क केल्यावरही प्रतिसाद मिळाला नसल्याची सूत्रांची माहिती आहे. हीच स्थिती इतरही काही ठिकाणची असल्याचे कळते.

‘‘विलगीकरण केंद्रात तातडीने अहवाल पीडीएफ फाईल आणि ईमेलवर पाठवले जात आहे. मध्यंतरी वरिष्ठ स्तरावरून एका मोबाईल अ‍ॅपवर नोंदणीबाबतच्या सूचना आल्या होत्या. परंतु लॉगीन आणि पासवर्डबाबत स्पष्टता नसल्याने हा प्रश्न सुटताच त्याची अंमलबजावणी केली जाईल. प्रयोगशाळेतील सॉफ्टवेअरच्या नोंदणीची माहिती घेऊन त्यात काही दोष असल्यास ते दुर करण्याचे प्रयत्न केले जाईल.’’

– डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा शल्यचिकित्सक, नागपूर.

उपराजधानीतील

विषाणू प्रयोगशाळा

*  मेयो

*  मेडिकल

*  एम्स

*  माफसू

*  निरी