नागपूर : कोळसा उपलब्ध आहे, परंतु रेल्वेच्या रेक्स मिळत नाहीत. रेक्स असलेल्या भागात कोळसा नाही. विरोधक आम्ही कोळशाचा साठा केला नसल्याचे सांगतात. परंतु रेक्स उपलब्ध केल्या नाहीत तर कोळशाचा साठा कसा करणार, असा सवाल उपस्थित करीत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी भारनियमनावरून पुन्हा केंद्राकडे बोट दाखवले.

दीक्षाभूमीला भेट दिल्यानंतर डॉ. राऊत प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. राऊत म्हणाले, आजचे वीज संकट फक्त कोळशामुळे आहे. करोनानंतर सर्वजण कामाला लागले. दुसरीकडे सणासुदीचा काळ आणि तापमान वाढीने विजेचा वापर वाढला. त्यामुळेही मागणी व पुरवठय़ातील दीड हजार मेगावॅटच्या तफावतीने वीज संकट निर्माण झाले. ही तफावत जास्त असल्याचे अतिरंजित पद्धतीने विरोधक सांगत आहेत. आज सर्व वीजनिर्मिती प्रकल्प सुरू आहेत. परंतु, आम्ही कोळशाअभावी ते पूर्ण सक्षमतेने चालवू शकत नाही. केंद्राने आम्हाला कोळशाचा साठा दिला असता तर परदेशातील कोळसा विकत घ्यावा लागला नसता. वीज हानी व वीजचोरी असलेल्या भागातच भारनियमनाचा प्रयत्न आहे. सामान्यांना आम्ही त्रास देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

विजेची तूट भरून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. अजून ग्रामविकास विभागाचा ९ हजार कोटींचा निधी मिळायचा आहे. काही अधिकारी ग्रामविकास आणि नगरविकास विभागाच्या निधीवरील व्याज आणि विलंब आकार माफ करा म्हणतात. मग सामान्यांनी काय केले? शासनाला निधी देण्याची विनंती केली आहे, असेही डॉ. राऊत यांनी सांगितले.

काँग्रेसच्या बदनामीचा राष्ट्रवादीचा डाव : बावनकुळे

राज्य शासनाच्या विविध विभागांकडे वीज कंपन्यांचे १८ हजार कोटी थकीत आहेत. परंतु ऊर्जामंत्री लोकांकडे शिल्लक पाचशे रुपये मागत आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या आपसातील वादामुळे हे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे ऊर्जा विभागातील रोख प्रवाह बिघडला. पैसे नसल्याने ऊर्जा विभागाला कोळसा खरेदी करून वीज निर्माण करता येत नाही. कोळसा कंपन्यांनी जानेवारीपासून कोळसा घेण्यास सांगितल्यावरही तो घेतला नाही. बिगरकाँग्रेसी मंत्र्यांच्या विभागांनी वीज कंपन्यांचे पैसे थकवले. ही सत्तेतील पक्षांची आपसातली कुरघोडी आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष काँग्रेसच्या विभागांना बदनाम करत आहेत. भारनियमनाने काँग्रेस बदनाम होईल, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव असल्याचा आरापेही बावनकुळे यांनी केला.