महाराष्ट्राची एक इंचही जमीन देणार नसल्याचा इशारा

नागपूर : महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नावर राज्याने नेहमीच संयमाची भूमिका घेतली आहे. मात्र कर्नाटक सरकारकडून सीमा भागातील मराठी जनतेवर सातत्याने अन्याय केला जात असून महाराष्ट्राची एक इंचही जमीन देणार नाही. त्यामुळे कर्नाटक सरकारने आव्हानाची भाषा करू नये आणि आगीशी खेळण्याचा प्रयत्न करू नये, असा गर्भित इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी कर्नाटक सरकारला दिला.  

uddhav thackeray latest marathi news
“महाराष्ट्रद्वेष्टे सरकार घालवून द्या”, उद्धव ठाकरे यांचे आवाहन; म्हणाले, “एक नेता एक पक्ष असे…”
Eknath Shinde and Aditya thackeray
“महाराष्ट्राच्या बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांची पीआर टीम इन्फ्लुअन्सर्स आणि…”, आदित्य ठाकरेंचा दावा; आव्हान देत म्हणाले…
supriya sule water shortage in maharashtra
“ट्रिपल इंजिनचे खोके सरकार असंवेदनशील, त्यांना…”; राज्यातील पाणी टंचाईवरून सुप्रिया सुळेंची शिंदे सरकारवर टीका!
Ajit Pawar, sunetra pawar
दुभंगलेली मने जोडण्यावर अजित पवारांचा भर

सीमा प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेत कर्नाटक सरकारे एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही असा ठराव विधिमंडळात संमत केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना राज्य सरकारनेही मंगळवारी विधिमंडळात कर्नाटकच्या निषेधाचा ठराव केला होता. त्यामुळे चिडलेल्या कर्नाटकातील नेत्यांनी मुंबईत २० टक्के कन्नड लोक राहत असल्याचा दावा करीत केंद्रशासित करण्याची मागणी केली. कर्नाटकच्या मंत्री, आमदारांनी केलेल्या या मागणीचे तीव्र पडसाद आज विधिमंडळात उमटले आणि दोन्ही सभागृहांत पुन्हा कर्नाटकचा निषेध करण्यात आला. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर झालेल्या समझोत्याचे कर्नाटक सरकार पालन करीत नसल्याबद्दल त्यांना तंबी देण्याची विनंती शहा यांच्याकडे करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. 

सीमावाद प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही कर्नाटकच्या वतीने महाराष्ट्रातील जनतेच्या मनात चीड निर्माण करणारी वक्तव्ये केली जात आहेत. महाराष्ट्राने कायम संयमाची भूमिका घेत कोणत्याही वादावर तोडगा काढला आहे. मात्र या संयमाची परीक्षा घेऊ नका. आम्ही माणुसकी ठेवून काम करत असताना दुर्दैवाने कर्नाटक सरकार तेथील मराठी माणसावर अन्याय करत आहे. गुन्हे दाखल करत आहेत. त्यामुळे आगीशी खेळण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा शिंदे यांनी दिला. तसेच सीमाभागातील मराठी जनतेवर दाखल गुन्हे, खटले, सरकारतर्फे वकील देण्याची घोषणाही त्यांनी केली. सीमाप्रश्नाचा पाठपुरावा करण्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘राज्यात कानडी आनंदाने राहतात’

मुंबई कुणाच्या बापाची नाही, ती मराठी माणसाची आहे, महाराष्ट्राची आहे. मुंबईवर जेव्हा जेव्हा संकटे आली, तेव्हा तेव्हा मुंबईकरांनी एकत्र येऊन लढा दिला. करोनाकाळात याचा प्रत्यय आला आहे. राज्यात कन्नड लोक आनंदाने राहतात. यातील अनेकजण मोठा व्यवसाय करत आहेत. कर्नाटक सरकारकडून मराठी माणसांवर अन्याय सुरू झाला, तेव्हा मुंबईतील कानडी लोक भेटले आणि त्यांनीही कर्नाटकच्या भूमिकेचा निषेध केल्याचे शिंदे यांनी सांगितले.

विधानसभेतही तीव्र पडसाद

विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे कर्नाटकच्या अरेरावीकडे सभागृहाचे लक्ष वेधले. कर्नाटकचे मंत्री, आमदार सातत्याने महाराष्ट्रविरोधी गरळ ओकत असून त्यांना जशास तसे उत्तर देण्याची गरज आहे. मुंबईमध्ये कन्नडभाषिकंच नव्हे तर विविध प्रांतातून आलेले नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. महाराष्ट्राला त्यांचा अभिमान आहे. कर्नाटक सरकार सीमाप्रश्नाला विनाकारण वेगळं रूप देण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारनेही कर्नाटक सरकारला तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांना महाराष्ट्राच्या तीव्र भावना कळवाव्यात, असे पवार यांनी सांगितले. त्यावर  कर्नाटक सरकार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत झालेल्या समझोत्याचे पालन करीत नाही. त्यामुळे याबाबत शहा यांच्याकडे लेखी तक्रार करून कर्नाटक सरकारला समज देण्याची विनंती करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनाही पत्र पाठवून निषेध करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.