लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाणा: बुलढाणा लोकसभा मतदार संघासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी आक्रमक झाले. अकरा तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी सामूहिक राजीनामे जिल्हाध्याक्षांकडे सादर केले. बुलढाणा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा या आग्रही मागणीसाठी त्यांनी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांना साकडे घातले. दरम्यान, त्यांच्या प्रक्षुब्ध भावना लक्षात घेत बोंद्रे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी चर्चा केली.

यामुळे जिल्ह्यातील आघाडीमधील बिघाडी चव्हाट्यावर आली आहे. बुलढाण्यावर आपला हक्क समजून प्रचार सुरू करणाऱ्या ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या २० मार्चच्या जनसंवाद सभेला दोन दिवस होत नाही तोच आघाडीतील मोठा विसंवाद समोर आला आहे. काँग्रेसचा उमेदवार देण्यात यावा या मागणीसाठी सामूहिक राजीनामे देण्यात आल्याचे बुलढाणा शहराध्यक्ष दत्ता काकस व धाडचे माजी जिल्हा परिषद सदस्य रिजावन सौदागर यांनी सांगितले.

आणखी वाचा- गडचिरोली : ‘वडेट्टीवार’ समर्थक नेत्यांचा भाजप प्रवेशाने काँग्रेमध्ये खळबळ

जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्याकडे मतदारसंघातील पदाधिकारी यांनी राजीनामे दिल्याचे त्यांनी सांगितले. बुलढाणा पारंपरिकरित्या काँग्रेसचा मतदार संघ राहिलेला आहे. मात्र गेल्या पंधरा वर्षापासून हा मतदारसंघ आघाडीच्या माध्यमातून कधी राष्ट्रवादीला तर कधी दुसऱ्या पक्षाकडे जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना जनतेची कामे करताना अडचण जात आहे. त्यामुळे यावेळी हा मतदारसंघ काँग्रेसच्या चिन्हावर लढण्यात यावा व काँग्रेसची उमेदवारी प्रदेश सचिव जयश्री शेळके यांना देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान आमच्या भावना व मागणीबाबत जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी या सर्व घडामोडी तात्काळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फोनवरून कळविल्याचे काकस यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Major office bearers of congress in buldhana lok sabha constituency tendered their collective resignations scm 61 mrj
First published on: 22-03-2024 at 17:14 IST