लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार डॉ. नितीन कोडवते आणि डॉ. चंदा कोडवते या दाम्पत्याने ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेसच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे दाम्पत्य मागील काही वर्षापासून गडचिरोली काँग्रेसमध्ये सक्रिय होते. विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती.

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात सर्वत्र राजकीय वातावरण तापले आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला होणार आहे. परंतु गडचिरोली-चिमूर लोकसभेसाठी महायुतीसह महाविकासआघाडीकडून अद्याप उमेदवार घोषित न झाल्याने दोन्हीकडे अस्वस्थता दिसून येत आहे. अशात आज, शुक्रवारी मुंबई येथे गडचिरोली काँग्रेसचे नेते डॉ. नितीन व डॉ. चंदा कोडवते यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेसच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. डॉ. नितीन कोडवते हे लोकसभेसाठी इच्छुक होते. तर डॉ. चंदा कोडवते यांनी २०१९ मध्ये काँग्रेसकडून गडचिरोलीतून विधानसभा लढवली होती. त्यांचा भाजपचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी पराभव केला. विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक म्हणून या दाम्पत्याची पक्षात ओळख होती. पण निवडणुका सोडल्यास ते राजकिय वर्तुळात फारसे सक्रिय नव्हते. आता डॉ. नितीन कोडवते लोकसभेसाठी इच्छुक होते पण उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर झाल्याने त्यांनी भाजपची वाट धरली, अशी चर्चा काँगेसच्या गोटात आहे.

आणखी वाचा- गडचिरोली : पोलिसाचे अपहरण करून हत्या करणाऱ्या जहाल नक्षल समर्थकास अटक

यासंदर्भात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांना विचारले असता ते म्हणाले, कोडवते यांचे नावे लोकसभेसाठी इच्छुकांच्या यादीत नव्हते. मागील काही दिवसांपासून पक्षात त्यांची कार्यपद्धती बघता ते भाजपात जाणार अशी शक्यता असल्यानेच पक्षातून त्यांचे नाव पुढे करण्यात आले नाही. सहा महिन्यापूर्वीच ही बाब आम्ही पक्षश्रेष्ठींना सांगितली होती. तसेही ते पक्षात केवळ निवडणुकांपुरते सक्रिय होत असल्याने त्यांचा पक्षाला उपयोग नव्हता. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाने पक्षाचे कोणतेही नुकसान होणार नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr nitin kodawte and dr chanda kodawte of congress join bjp before lok sabha elections ssp 89 mrj
First published on: 22-03-2024 at 14:23 IST