महेश बोकडे

राज्यातील हजारो ज्येष्ठ नागरिकांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) बसच्या प्रवासात सवलतीसाठी  स्मार्टकार्डकरिता प्रत्येकी ५० रुपये भरले होते. परंतु अनेकांना अद्यापही स्मार्टकार्ड मिळाले नाही. विशेष म्हणजे, या कार्डच्या माहितीसाठी  वारंवार एसटी कार्यालयात चकरा मारण्यातच भरलेल्या शुल्काहून अधिक खर्च करावा लागत आहेत.

सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचे प्रमुख साधन म्हणून एसटीकडे बघितले जाते. एसटीत ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार, शालेय विद्यार्थी, सिकलसेल रुग्णासह इतरही २९ प्रकारच्या सवलती दिल्या जातात. यापैकी ज्येष्ठ नागरिक, पत्रकार व विद्यार्थ्यांना एसटीकडून स्मार्टकार्ड दिले जातात. त्यासाठी प्रत्येकी ५० रुपये शुल्क आकारले जाते.  एसटीने ज्येष्ठ नागरिकांना स्मार्टकार्ड बनवण्यासाठी अंतिम मुदत ३१ मार्च २०२० दिली होती.

या सवलतीपासून वंचित राहू नये म्हणून अनेक ज्येष्ठ नागरिकांनी तासन्तास रांगेत  उभे राहून शुल्क भरले. नागपुरातील मोरभवन बसस्थानकावर डिसेंबर- २०१९ मध्ये स्मार्टकार्डसाठी पैसे भरलेल्या दीडशेहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना अद्यापही हे कार्ड मिळाले नाही. मुंबईसह राज्यातील इतरही भागात हीच स्थिती आहे. या विषयावर एसटीच्या नागपुरातील मोरभवन बसस्थानकावरील अधिकाऱ्यांना विचारले असता ते येथील यंत्र खराब झाल्याचे सांगितले तर नागपूरचे विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे म्हणाले, संबंधित कंपनीकडून कार्ड बनवण्यासह, वितरणाला गती दिली गेली असून लवकरच सगळ्यांना कार्ड मिळेल.

‘‘ कार्डसाठी वारंवार कार्यालयात चकरा मारल्यावरही योग्य उत्तर मिळत नाही. हा ज्येष्ठ नागरिकांना छळण्याचा प्रकार आहे. तातडीने महामंडळाने सगळ्यांना कार्ड द्यायला हवे.’’

– कॅप्टन डॉ. एल. बी. कलंत्री

‘‘ज्येष्ठ नागरिकांना कार्डचे वितरण सुरू केले आहे. नवीन कार्ड तयार करण्याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. नागपूरसह कुठे काही अडचणी असल्यास तातडीने माहिती घेऊन त्या सोडवल्या जातील. ’’

– बालाजी भांगे, विभागीय वाहतूक अधिकारी,  एसटी महामंडळ, मुंबई.

‘‘स्मार्टकार्ड तयार करण्याची जबाबदारी एसटीने स्वत:कडे घ्यायला हवी. इतर कंपनीकडे काम दिले तर असाच विलंब होईल.’’

– अजय हट्टेवार, प्रादेशिक सचिव, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना.