नागपूर : ‘महायुतीतर्फे नाशिक लोकसभा मतदारसंघातून तुम्ही उभे राहा,’ असे मला सांगण्यात आले. त्यामुळे मी निवडणूक लढण्यासाठी तयार झालो. आता कोणाला काय वाटते, याचा विचार मी करत नाही. नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचा खासदार असल्याने त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे, तो कसा सोडवायचा हे महायुतीने ठरवावे. मात्र मी तयार आहे, अशी माहिती राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी नागपुरात दिली.

नाशिकमध्ये १९ लाख मतदार आहेत, त्यात मराठा समाजाचे साडेपाच ते पावणेसहा लाख मतदार आहेत. मराठा समाजाचे मत मला मिळतील. सगळेच मराठा मतदार माझ्याविरुद्ध बोलतात, असे नाही. मराठ्यांना वेगळे आरक्षण द्या, अशी मागणी होती आणि आम्ही ते दिले आहे. त्यामुळे आता हा मुद्दा नाही, असेही भुजबळ म्हणाले.

हेही वाचा >>> बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज बॉम्बने उडवण्याची धमकी; नागपुरातील कर्मचाऱ्याला फोन

गेल्या २४ तारखेला मला सांगण्यात आले आणि मी तयारी सुरू केली. आता महायुतीने जो निर्णय घ्यायचा तो घ्यावा, पण मतदानाच्या आधी घ्यावा. मला उमेदवारी मिळाल्याने राज्यात महायुतीला ओबीसी मतांचा लाभ होईल का, हे जाणकारांनीच ठरवावे. आम्ही ओबीसींच्या समाजकारणाचा विचार करत आलो आणि त्याला राजकारणाची जोड असायला हवी. पण मराठा राजकारणात आल्यानंतर निवडून येऊ शकत नाही, असे माझे आव्हान आहे. मराठा समाज महाराष्ट्रात आहे. ही देशाची निवडणूक आहे. मोदींना निवडून द्यायचे आहे. दिल्लीतील नेत्यांना मी हवाहवासा वाटतो का, याचे मला ज्ञान नाही. पण, दिल्ली माझ्यासाठी काही नवीन नाही, असेही भुजबळ यांनी सांगितले. भूक ही मनुष्याची पहिली गरज आहे. यामुळे सरकार त्यांना मोफत रेशन देत आहे आणि हे देत असताना शेतकऱ्यांना एमएसपी द्यावेच लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.