नागपूर : ‘तुम्ही अमेरिकन कंपनीचे शेअर्स खरेदी करा, अन्यथा बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजची इमारतीत बॉम्बस्फोट करणार आहे,’ अशी धमकी देणारा एक फोन झिरो माईल चौकातील एका कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला आला. त्याने लगेच पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

हेही वाचा >>> प्रियंका गांधींच्या सभेला मैदान मिळू नये म्हणून… आमदार सुभाष धोटेंच्या आरोपाने खळबळ

नागपूर पोलिसांकडून मुंबई पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. झिरो माईल चौकात एनएसए नावाच्या कंपनीचे कार्यालय आहे. तेथे कार्यरत अंशूल त्रिपाठी याला मंगळवारी सकाळी फोन आला. मुंबई गोरेगावमधून बोलत असल्याचे समोरच्या व्यक्तीने सांगितले. अमेरिकन शेअर्स विकत घ्या, अन्यथा बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या इमारतीत बॉम्बस्फोट करणार, अशी धमकी त्याने दिली. अंशुलने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली आणि लगेच सीताबर्डी पोलीस ठाणे गाठले. ठाणेदार आसाराम चोरमाले यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गुन्हा दाखल केला. त्यांनी मुंबई आणि नागपूरच्या दहशतवादविरोधी पथक (एटीएस) कार्यालयाला माहिती दिली. पुढील कारवाई सुरू आहे.