भाजपचे चार आमदार आणि १०८ नगरसेवक ‘दिमती’ला!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील एका प्रभागाची पोटनिवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली असल्याचे चित्र मतदानाच्या दिवशी दिसून आले. पक्षाचे सर्व आमदार, महापौरांसह सर्व १०८ नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी हा प्रभाग पिंजून काढला.

शहरातील प्रभाग ३५ अ मध्ये भाजपचे नगरसेवक नीलेश कुंभारे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी आज मतदान झाले. या प्रभागात चारपैकी तीन नगरसेवक भाजपचेच आहेत. हा प्रभाग मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात येतो. येथून भाजपने माजी नगरसेवक संदीप गवई यांना उमेदवारी दिली. गवई हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक मानले जातात. भाजपला महापालिकेत पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक पक्ष गांभीर्याने घेणार नाही, असे सुरुवातीचे चित्र होते. मात्र एकीकडे मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ व दुसरीकडे गडकरी समर्थक यामुळे भाजपने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली. त्यामुळे भाजपचे सर्व आमदार, महापालिकेतील सर्व नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी आणि माजी नगरसेवक सक्रिय झाले होते. नरेंद्रनगर, मनीषनगर, सुयोगनगर हे खरे तर भाजपचे बालेकिल्ले आहेत. भाजप कार्यकर्ते आणि नगरसेवक स्वत: फिरून मतदारांना मतदानासाठी बाहेर काढत होते. भाजप उमेदवाराने ४० पेक्षा अधिक चारचाकी वाहने कार्यकर्त्यांना उपलब्ध करून दिली होती. शिवाय प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवकांची वाहनेही त्यांच्या जोडीला होती. प्रत्येक वस्तीमध्ये किमान दोन बूथ उभारण्यात आले आणि कार्यकर्त्यांचा स्वतंत्र चमू तयार करण्यात आला होता.

आमदार सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, डॉ. मिलिंद माने, विकास कुंभारे यांच्यासह सत्तापक्ष नेता संदीप जोशी, महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव, माजी महापौर प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, महामंत्री भोजराज डुंबे, माजी नगरसेवक मुन्ना यादव यांच्यासह विविध आघाडय़ाचे प्रमुख, सर्व नगरसेवक विविध वस्त्यांमध्ये फिरताना दिसून आल्यामुळे खऱ्या ही लढाई गवईंना निवडून आणण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांच्या वर्चस्वासाठी लढली जात असल्याचे चित्र मतदानाच्या वेळी दिसून आले.