महापौर-आयुक्त वाद शिगेला पोहोचला

नागपूर : सभेच्या एकदिवसा आधी खुद्द महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याने मंगळवारी होणारी महापालिकेची सभा वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.

शनिवारी झालेल्या सभेत नगरसेवकांच्या व्यक्तिगत टीकेमुळे व्यथित होऊन आयुक्त  सभा अर्धवट सोडून निघून गेले होते. त्यामुळे स्थगित करण्यात आलेली सभा उद्या मंगळवारी होत आहे. महापालिकेत महापौर संदीप जोशी  विरुद्ध आयुक्त तुकाराम मुंढे असा वाद आता चांगलाच शिगेला पोहोचला आहे. शनिवारच्या सभेत त्याचे पडसादही उमटले होते.

रविवारी  जोशी यांनी आयुक्तांच्या नावे एक पत्र समाजमाध्यमांवर जारी केले होते व त्यात सर्व राग विसरून आयुक्तांनी सभेला यावे, असे आवाहन केले होते. त्या पत्राबाबत सोमवारी मुंढे यांनी समाजमाध्यमांकडे प्रतिक्रिया देताना महापौरांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती.

या टीकेलाही महापौरांनी त्यांच्या पद्धतीने उत्तर दिले होते. त्यातच सोमवारी दुपारी महापौर संदीप जोशी स्मार्टसिटीतील कामकाजावरून मुंढेंच्या विरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यामुळे वातावरण अधिक तापले आहे. या तापलेल्या वातावरणाचे पडसाद उद्याच्या सभेत उमटण्याची दाट चिन्हे आहेत.

आयुक्त मुंढे आज सभेला हजर राहणार

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे शनिवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा अध्र्यावर सोडून निघून गेल्यानंतर महापौर आणि आयुक्त यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. या पाश्र्वभूमीवर मंगळवारी होत असलेल्या सर्वसाधारण सभेला आयुक्त उपस्थित राहणार की नाहीत, याबाबत संभ्रम कायम होता. परंतु आयुक्त मुंढे उद्या या सभेला हजर राहणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते.

आयुक्त मुंढे सभा अर्धवट सोडून निघून गेल्यावर सभा स्थगित करण्यात आली होती. ती सभा उद्या होत आहे. आयुक्तांनी या सभेला हजर राहण्याची विनंती करणारे पत्र महापौर संदीप जोशी यांनी पाठवले. त्याला प्रतिउत्तर देताना आयुक्तांनी एका वृत्तवाहिनीवर महापौरांवर दुटप्पी भूमिकेचा आरोप केला. आयुक्तांवर वैयक्तिक आरोप होत असताना महापौरांनी हस्तक्षेप केला नाही. तसेच आयुक्तांचे  न ऐकता सदस्य मध्येच बोलत होते आणि अर्धवट ऐकून वेगळा अर्थ काढत होते. अशाप्रकारे माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोपही आयुक्तांनी केला. यावर उत्तर देताना महापौर जोशी म्हणाले, अधिकाऱ्याचे बोलून झाल्यावरच सदस्यांनी बोलायचे असा नियम असता तर पाईन्ट ऑफ इन्फार्मेशन हे आयुध सभागृहाच्या कामकाजात कशाला टाकण्यात आले असते?  सदस्यांचे बोलणे सुरू होताच आयुक्त बाहेर पडले. मला महापौर म्हणून निर्देश देण्याची संधी देखील दिली नाही, असे महापौर म्हणाले. दरम्यान हे प्रकरण अधिक ताणून न धरण्याचे आयुक्तांना प्रशासनातील वरिष्ठांनी सूचना केली. तसेच त्यांना सभागृहात हजेरी लावून प्रशासनाची बाजू मांडण्याची सूचना केली.

त्यामुळे आयुक्त मुंढे  उद्या, मंगळवारी सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. दरम्यान, महापौरांनी आज पुन्हा आयुक्तांनी सभेला येण्याची विनंती केली. महापौर म्हणून मी निर्देश द्यायला हवे, पण शहराच्या विकासासाठी मी आयुक्तांनी विनंती करीत आहे. याबद्दल पत्रकारांनी अधिक प्रश्न विचारले असता आयुक्तांनी बोलणे टाळले.