प्रशासकीय दिरंगाईमुळे प्रस्ताव तीन वर्षांपासून थंड बस्त्यात
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या काळात एकीकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास होत असताना आणि जनतेला सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्न सुरू असताना महापालिकेच्यावतीने उपराजधानीत ऑफ्टिकल फायबरचे जाळे विणण्याची अभिनय योजना राबविण्याचा निर्णय घेतला असताना गेल्या तीन वर्षांत मात्र महापालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही योजना केवळ कागदावर असल्याचे समोर आले आहे.
आधुनिक युगात मोबाईल, इंटरनेट, टीव्ही यासारख्या सुविधा गरजेच्या बनल्या आहेत. एकाच केबलद्वारे या सुविधा दिल्या जाऊ शकतात आणि त्यासाठी अनेक कंपन्याकडून महापालिका प्रशासनाला विचारणा करण्यात आली होती. एका कंपनीकडून जाळे पसरवून घेऊन महापालिकेतर्फे अन्य कंपन्यांना व्यवसायासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय तत्कालिन स्थायी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांच्या कार्यकाळात घेण्यात आला होता. त्या संदर्भातील एक प्रस्ताव तयार करुन तो मंजूर करुन घेतला होता आणि तत्कालिन आयुक्त श्याम वर्धने यांच्याकडे पाठविला होता मात्र त्या प्रस्तावावर अनेक दिवस चर्चा झाल्यानंतर गेल्या काही दिवसांत मात्र त्याचा पाठपुरावा करण्यात आलेला नाही. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने शहरात या अभिनव योजनेची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या.
या योजनेतून शहरात १७०० किमी लांबीचे जाळे पसरविण्यात येणार होते आणि त्यातून महापालिकेच्या तिजोरीत १५ ते २० कोटी रुपये उत्पन्नाची भर पडणार असल्याचे मोठमोठे दावे करण्यात आले होते. सद्यस्थितीत शहरात महापालिकेचे १५६ किमी केबलचे जाळे आहे, ९०० किमी लांबीच्या नाल्या, २०० किमी इलेक्ट्रिक केबलच्या लाईन आहेत. सोबतच वापरात नसलेल्या ४०० ते ५०० किमी जुन्या पाईपलाईन आहेत. २४ बाय ७ योजनेतंर्गत नवीन जलवाहिन्या टाकण्यात येत असल्याने अनेक किमीच्या जुन्या पाईपलाईन निरुपयोगी ठरणार आहेत. या लाईनचा उपयोग केबल डक्ट पसरविण्यासाठी होणार होता त्यामुळे खोदकामाची फारशी गरज भासणार नव्हती. या योजनेसाठी रोडमॅप बनविणे आवश्यक होते त्यासाठी एका कंपनीची नियुक्ती करुन ‘ईओआय’ मागविण्यात आले होते आणि तीच कंपनी ही यंत्रणा उभारुन देणार होती. शिवाय अर्थसंकल्पात या प्रकल्पाचा समावेश असून २०१५ पर्यंत हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते मात्र २०१६ सुरू झाल्यानंतरही महापालिका प्रशासनाने यासंदर्भात कुठलाच निर्णय घेतला नसून होता तो प्रस्ताव थंडबस्त्यात पडला आहे.

ऑप्टिकल फायबर ही योजना शहरात राबविण्याचा निर्णय घेऊन त्यासंबंधीचा प्रस्ताव तत्कालिन आयुक्त श्याम वर्धने यांच्याकडे सोपविण्यात आला होता मात्र त्यांनी त्या प्रस्तावावर काहीच निर्णय घेतला नसल्यामुळे आणि अजुनही त्याबाबत कुठलाच पाठपुरावा केला गेला नसल्यामुळे सध्या हा प्रस्ताव कागदावर आहे. मात्र या प्रकल्पाचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आला असून, ज्यावेळी नागपूर शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश होईल त्यावेळी हा प्रकल्प राबविला जाईल.
– अविनाश ठाकरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष