स्थानिक बाजारातील कोटय़वधींची उलाढाल प्रभावित

नागपूर : नवरात्रानंतर दसरा आणि दिवाळी अशा सणासुदीच्या काळात नागपूरकरांनी स्थानिक बाजारपेठेत जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन खरेदीला पसंती दर्शवली आहे. बाजारात करोनाचा धोका कायम असून ऑनलाईन खरेदीवर सवलतींचा वर्षांव सुरू आहे. त्यामुळे ऑनलाईन खरेदीवर जोर दिला जात आहे. स्थानिक बाजारपेठेतील कोटय़वधींची उलाढाल मात्र प्रभावित झाली आहे.

सध्या नवरात्र सुरू असल्यामुळे बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी लगबग सुरू आहे. पुढील आठवडय़ात दसरा आणि नंतर दिवाळी आहे. त्यामुळे आतापासूनच ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांनी ग्राहकांवर सवलतीचा वर्षांव केला आहे. टाळेबंदीमुळे बाजारपेठांमध्ये पाच महिने कपडे, इलेक्ट्रॉनिक साहित्य पडून होते. त्यामुळे ग्राहकांनी नव्या स्टॉकच्या खरेदीसाठी बाजारपेठांपेक्षा ऑनलाईन खरेदीचा पर्याय निवडला आहे. तरुणाई व उच्चशिक्षित वर्गाची यात संख्या मोठी आहे. अगदी कपडय़ांपासून तर इलेक्ट्रॉनिक उपकरणे व मोबाईल ऑनलाईन खरेदी केले जात आहे. सामान्यत: दरवर्षी दसरा व दिवाळीच्या पंधरा दिवसांपूर्वी नागरिकांची बाजारपेठांमध्ये खरेदी करण्यासाठी गर्दी होत असते. मात्र गेल्या काही वर्षांत बाजारपेठेतील गर्दी ऑनलाई शॉपिंग कंपन्यांनी आपल्याकडे खेचली आहे. त्यातच करोनाच्या महामारीमुळे ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांचे चांगले फावत आहे.

सध्या करोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी बाजारात होणाऱ्या गर्दीपासून प्रादुर्भावाचा धोका कायम आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी धोका पत्करण्यापेक्षा घरबसल्या आपल्या आवडत्या वस्तूंच्या खेरदीला ग्राहक प्राधान्य देत आहेत.

विशेष म्हणजे, विदेशी बनावटीच्या वस्तू बाजारात उपलब्ध नसतात. त्या सहज ऑनलाई उपलब्ध असून घरपोच मिळत आहेत. त्याशिवाय महागडय़ा उपकरणांसाठी ऑनलाईन शॉपिंगमध्ये कर्जाची अथवा इएमआयची सोय असते. त्यामुळे सहज खरेदी होते. मात्र ऑनलाईनच्या खरेदीचा स्थानिक बाजारपेठातील व्यापाऱ्यांना चांगलाच फटका बसत असून सणासुदीच्या काळात कोटय़वधींचा त्यांचा व्यवसाय हिरावला जात आहे.

स्थानिक बाजारपेठातील तब्बल चाळीस टक्के व्यापार ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांनी आपल्याकडे खेचला आहे. त्यामुळे कॉन्फ्रीडेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने आता स्थानिक व्यापाऱ्यांसाठी भारत ई-मार्केट ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. त्यामध्ये स्थानिक सर्व दुकानदार विक्रेते असतील. त्यामुळे ग्राहकांना आपण शहरातील कोणत्या दुकानातून वस्तू खरेदी करत आहोत हे कळेल. स्थानिक व्यापाऱ्यांनाही आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सेवा देण्याची गरज आहे.

– बी.सी. भरतिया, राष्ट्रीय अध्यक्ष कॅट.