अशोक चव्हाण यांच्याशी आज मुंबईत बैठक

शहर काँग्रेस महापालिका आगामी निवडणुकीकरिता उमेदवारांची निवड करण्यासाठी एक वेगळा प्रयोग करणार असून इच्छुकांना प्रभागनिहाय अर्ज करण्याची सूचना करण्यात येणार आहे. प्राप्त अर्जातून उमेदवारांची निवड करून अंतिम यादी निश्चित केली जाईल. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उद्या, गुरुवारी मुंबईत बैठक बोलावली असून यावेळी या मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

प्रदेश काँग्रेसने नागपूर शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, आमदार विजय वडेट्टीवार आणि सहा विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक यांना २९ सप्टेंबरला मुंबईला बोलावले आहे. महापालिका निवडणूक रणनीती निश्चित करण्यासाठी ही बैठक आहे. यात शहर काँग्रेसतर्फे निवडणूक ‘गेमप्लॉन’ सादर केला जाणार आहे. महापालिका निवडणुकीत उमेदवारी घोषित करताना विलंब होतो. यामुळे इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. त्याचा परिणाम मतदारांवर देखील होतो. हे टाळण्यासाठी शहर काँग्रेस महापालिका निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी हवी असणाऱ्यांकडून अर्ज मागवणार आहे. त्या अर्जात इच्छुकांकडे बुथनिहाय कार्यकर्त्यांची संख्या, ज्या भागासाठी इच्छुक आहे, त्या भागातील नागरिक समस्या, त्यासाठी त्यांनी केलेला पाठपुरावा आदी बाबींची माहिती प्राप्त केली जाणार आहे. महापालिका किंवा नागपूर सुधार प्रन्यास यांच्या संबंधित जनतेच्या प्रश्नांवर केलेले कार्य याचाही तपशील मागवण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इच्छुक उमेदवाराकडे एका बुथवर १५ कार्यकर्ते असणे आवश्यक असून त्यांच्या किमान ५० लोकांमध्ये संपर्क असला पाहिजे, अट राहणार आहे. प्राप्त झालेल्या अर्जातून शहर काँग्रेस छाननी करेल आणि अंतिम यादी तयार केली जाईल. उमेदवार निवडण्याच्या या पद्धतीमुळे इच्छुकांच्या पाश्र्वभूमीवर आणि त्याच्या जनमानसातील संपर्काची चाचपणी केली जाणार आहे.शहर काँग्रेस महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहे. देवडिया काँग्रेस भवन येथून २ ऑक्टोबरपासून इच्छुकांना अर्ज वितरित केले जातील. ते त्यांना १५ दिवसात भरून सादर करण्याची मुदत देण्यात येईल, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात काँग्रेसचे सात नगरसेवक आहेत. महापालिकेच्या मागील निवडणुकीत उमेदवारी मागणाऱ्या इच्छुकांना कार्यकर्ते दाखवण्यास सांगण्यात आले. कार्यकर्ते अमूक-अमूक व्यक्तीला उमेदवारी द्या, अशी मागणी घेऊन विरोधी पक्ष नेत्यांकडे येत होते. ज्यांच्याकडे बुथनिहाय किमान १५ कार्यकर्ते असतील त्यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. शहरातील इतर मतदारसंघापेक्षा दक्षिण-पश्चिममध्ये चांगला निकाल आला. तो पॅटर्न आगामी निवडणुकीत लागू करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.