नागपूर: जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याच्या दावा करणारा भाजप पक्ष अद्यापही आपला राष्ट्रीय अध्यक्ष निवडू शकलेला नाही. यासंदर्भात अनेकदा प्रश्न उपस्थित झाल्यावरही लवकरच भाजप नवीन राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव जाहीर करू शकते अशी चर्चा पुढे येते.
भाजप नवीन अध्यक्षपदासाठी सध्या नावांवर विचार करत आहे, ज्यामध्ये केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, मनोहर लाल खट्टर, भूपेंद्र यादव आणि धर्मेंद्र प्रधान यांचा समावेश आहे. त्याच वेळी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे एक विधान चर्चेचा विषय झाला आहे. गडकरी यांची नुकतीच शुभांकर मिश्रा यांच्या ब्रॉडकास्ट चॅनलवर मुलाखत घेण्यात आली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, संसदीय समितीमध्ये गडकरींना स्थान का नाही, या प्रश्नावर गडकरींनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना गडकरी यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची चांगली मर्जी होती. २०१४ मधील लोकसभा निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली लढली जावी यासाठी गडकरींना पुन्हा अध्यक्ष करण्याची संघनेत्यांची इच्छा होती. २००४ व २००९ मधील लोकसभा निवडणुकांतील भाजपच्या पराभवानंतर संघाच्या आग्रहानंतर गडकरींकडे नेतृत्वाची कमान सोपवण्यात आली होती. भाजप पक्षाच्या घटनेनुसार कोणत्याही अध्यक्षाला दुसऱ्यांचा संधी दिला जात नाही. असा नियम असला तरी पक्षाच्या घटनेत अनेकदा सुधारणा झालेली आहे. गडकरींना दुसऱ्यांदा अध्यक्ष करण्यात आले होते. सध्या भाजपच्या अध्यक्षाच्या निवडणुकीची चर्चा असताना, नुकत्याच झालेल्या मुलाखतीमध्ये गडकरींना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता.
गडकरी नेमके काय म्हणाले?
नितीन गडकरी असे व्यक्ती आहेत ज्यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यासाठी पक्षाने त्यांच्या संविधानात बदल केला होता. मात्र, आता मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वात प्रभावी मंत्री असतानाही त्यांना संसदीय मंडळ, भाजपच्या केंद्रीय निवड समितीमध्ये संधी का दिली नाही, असा प्रश्न करण्यात आला. यावर गडकरी म्हणाले की, आदमार, मंंत्री, खासदार, अध्यक्ष हे सगळी पदे एक दिवस माजी होतात. मात्र, कार्यकर्ता कधीच माजी कार्यकर्ता होऊ शकत नाही. हे पद कधीच कुणी माझ्याकडून घेऊ शकत नाही. त्यामुळे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी कायम काम करत राहणार आहे. आणि कुणाला काही बनवायचे आणि बनवायचे नाही हे पक्ष अध्यक्ष आणि पक्ष ठरवेल. यासोबतच पंतप्रधान पदाची चर्चा ही काही स्वस्त प्रसार माध्यमांनी केली. मी विचारधारेसोबत कधीच तडजोड करणार नाही. कुठल्याही पदाचा मोह नाही. आपले विचार आणि सिद्धांतांना मी मोठे मानतो. पंतप्रधान बनायचे असेल तरी मी माझ्या विचारधारेशी कधीही तडजोड करणार नाही, असेही गडकरी म्हणाले.