गडचिरोली : दोन वर्षांपूर्वी प्रसूतीदरम्यान झालेल्या माता मृत्यूप्रकरणी कोणतीही कारवाई न करता अहवाल दडपण्याचा प्रयत्न होत आहे. देसाईगंज तालुक्यातील पोटगाव येथील भारती आकाश मेश्राम (२१) असे मृत महिलेचे नाव असून याप्रकरणी पाठवलेला अहवाल जिल्हा प्रशासनाकडे धुळखात पडून आहे.

३ ऑक्टोबर २०२० रोजी पोटगाव येथील भारती मेश्राम हिला पहाटे एक वाजताच्या सुमारास प्रसूतीकळा येऊ लागल्याने देसाईगंज येथील मतृछाया या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, सकाळी सहाच्या सुमारास भारतीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र, प्रसूतीदरम्यानच्या वैद्यकीय गुंतागुंतीबाबत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला न घेता डॉ. अनिल नाकाडे यांनी उपचार केल्याने महिलेला अतिरक्तस्त्राव होऊ लागला. रुग्णालय प्रशासनाने तशाच परिस्थितीत तिला सुटी दिली. त्यामुळे तिला घरी नेण्यात आले, जेव्हा की तिला उपचाराची गरज होती. दरम्यान, ११ वाजताच्या सुमारास भारतीच्या कुटुंबीयांनी तिला बेशुद्ध अवस्थेत आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले.

हेही वाचा… गडचिरोली : नरभक्षी सीटी १ वाघाचा शोध सुरूच; आतापर्यंत घेतले १२ बळी

हेही वाचा… Maharashtra News Live : राज्यातील सत्तासंघर्षावर आजही निर्णय नाहीच; महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

दोन वर्षांपूर्वीच अहवाल सादर

या प्रकरणाची चौकशी करून समितीने आपला अहवाल जिल्हा प्रशासनाकडे दोन वर्षांपूर्वीच सादर केल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी अभिषेक कुंभरे यांनी सांगितले. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झालेली नसल्याने आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहे.

आरोग्य अधिकारी चालवतात खासगी रुग्णालये!

देसाईगंज तालुक्यातील १० आरोग्यवर्धिनी केंद्रातील बहुतांश समुदाय आरोग्य अधिकारी मुख्यालयी न राहता बाहेर खासगी रुग्णालये चालवतात, अशी चर्चा आहे. याविषयी विचारणा करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.