चंद्रपूर : राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर काँग्रेसच्या विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसची राष्ट्रीय विद्यार्थी संघटना अर्थात एनएसयूआयच्यावतीने चंद्रपूर शहरातील पडोली येथील प्रत्येक घरावर राहुल गांधी यांचे छायाचित्र लावून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची जाणीव जनतेला करून दिली जात आहे. हेही वाचा >>> बुलढाणा : प्रक्षोभक भाषण, जातीय व सामाजिक तेढ वाढवल्याचा आरोप; हिंदुराष्ट्र सेनेचे धनंजय देसाईंसह अठरा जणांविरुद्ध गुन्हे शहराचे प्रवेशद्वार असलेल्या पडोलीतील अनेक घरांच्या भिंतींवर राहुल गांधी यांच्या समर्थनाचे स्टीकर्स लावण्यात आले आहेत. या संदर्भात एनएसयूआयचे नेते रोशन लाल बिट्टू यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली. यात त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला आहे. “चंद्रपूर महाराष्ट्रातील पडोली गावाचे दृश्य, पंतप्रधान मोदी राहुल गांधींना किती हृदयातून आणि घरांतून काढून टाकतील, असे ट्विट त्यांनी केले आहे. हुकुमशाही व्यवस्थेला आरसा दाखवत राहुल गांधी यांनी रस्त्यावरून संसदेपर्यंत आमचा आवाज उचलून धरला आहे. यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. एनएसयूआयच्या या अभियानाला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे बिट्टू यांचे म्हणणे आहे. राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करणे ही देशात हुकूमशाहीची सुरुवात आहे, असा आरोप काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी यापूर्वीच केला आहे, तर माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, माजी खासदार नरेश पुगलिया यांनीही भाजपप्रणित मोदी सरकार दडपशाही करीत असल्याची टीका केली आहे. आता काँग्रेस नेत्यांनी या माध्यमातून राहुल गांधी व त्यांच्यावरील अन्यायाला घराघरात पोहचवण्याचे काम सुरू केले आहे.