लोकसत्ता टीम

नागपूर : केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदा ८५ वर्षांवरील नागरिक तसेच ४० टक्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या मतदारांना गृह मतदानाची मुभा दिली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात तीन दिवसांपूर्वीच गृह मतदान करणाऱ्या एका वृद्धाचा गुरूवारी मृत्यू झाला. यांचे हे शेवटचे मतदान ठरले.

रूपलाल मोहनलाल हिरणवार (८८) रा. गवळीपुरा, धरमपेठ असे निधन झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ते माजी नगरसेवक सुनील हिरणवार यांचे नातेवाईक आहे. रूपलाल यांनी १५ एप्रिल २०२४ रोजी नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी गृह मतदान केले होते. त्यानंतर रुपलाल यांची प्रकृती खालवली. उपचारादरम्यान त्यांचा गुरूवारी (१८ एप्रिल)ला मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर नागपुरातील अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आला.

आणखी वाचा- नागपुरात उन्हाच्या तडाख्यात दोन निवडणूक अधिकाऱ्यांची प्रकृती बिघडली, झाले असे की…

दरम्यान नागपूर लोकसभा मतदारसंघात १७ एप्रिलपर्यंत सुमारे १ हजार २५७ ज्येष्ठ नागरिक आणि अपंग बांधवांकडून गृह मतदानाचा हक्क बजावण्यात आला होता. नागपुरात गृह मतदानासाठी सुमारे १ हजार ३४१ मतदारांनी नोंद केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदा ८५ वर्षांवरील नागरिक तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध केली आहे, हे विशेष.