यवतमाळ : २०१४ पूर्वी केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार होते व महाराष्ट्रातील नेते कृषीमंत्री होते. तेव्हा शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केले जात होते. पण ते त्यांच्यापर्यंत पोहचतच नव्हते, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नाव न घेता केली.यवतमाळ येथे बुधवारी आयोजित महिला मेळाव्यात मोदी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस व अजित पवार, जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यासह यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी उपस्थित होत्या.

मोदी यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली व त्यानंतर त्यांनी इंडिया आघाडी व काँग्रेसवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या मदतीवरून त्यांनी शरद पवार यांना त्यांचे नाव न घेता लक्ष्य केले. ते म्हणाले, जेव्हा दिल्लीत संपुआ सरकार होते, तेव्हा काय अवस्था होती? तेव्हा तर महाराष्ट्रातले कृषिमंत्री (शरद पवार) होते. तेव्हा दिल्लीतून शेतकरी पॅकेज जाहीर व्हायचे मात्र शेतकऱ्यांच्या हाती पैसे जात नव्हते. केंद्र सरकारने एक रुपया पाठवला तर गावात फक्त १५ पैसे पोहचत. आज मी एक बटण दाबले आणि लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हजार कोटी रुपये जमा झाले. हीच तर मोदींची गॅरंटी आहे. आता काँग्रेस शासन असते, तर २१ हजार कोटींपैकी १८ हजार कोटी खाऊन टाकले असते.

हेही वाचा >>>चंद्रपूर : पोटासाठी बंद खाणीतून कोळसा काढताना मृत्यू, ढिगाराच अंगावर कोसळला

१० वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने यवतमाळ जिल्ह्यात ‘चाय पे चर्चा’साठी आलो होतो. तेव्हा एनडीएला ३०० हून अधिक जागा मिळाल्या होत्या. २०१९ मध्ये आलो तेव्हा एनडीएचे संख्याबळ ३५० हून अधिक झाले. आता २०२४ मध्ये नवीन विकास पर्वाला आलो आहे. तेव्हा देशात एकच आवाज आहे, अब की बार ४०० पार. विदर्भात ज्या पद्धतीचे प्रेम मिळत आहे, ते पाहता हे लक्ष्य निश्चित पूर्ण होईल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>>पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमार्गे यवतमाळात

देशाच्या प्रत्येक कोपऱ्याला विकसित बनवण्याचे माझे स्वप्न आहे. त्यासाठी चार प्राधान्य घटक आहेत. गरीब, युवा, शेतकरी, महिला हे सशक्त झाले तर देश विकसित होईल. आज या चारही घटकांसाठी काम झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा रेल्वेमार्ग तयार झाला आहे. पूर्वी देशात १०० कुटुंबापैकी फक्त १५ कुटुंबांनाच नळाद्वारे पाणीपुरवठा होत असे. आता हे प्रमाण आम्ही वाढवले असून १०० पैकी ७५ कुटुंबांना पाणी मिळत आहे. आदिवासींसाठी विविध योजना राबवून त्यांना मदत केली जात आहे. महाराष्ट्रातील अनेक सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी केंद्राने निधी दिला आहे. मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी आहे, असेही मोदी म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्राच्या मदतीमुळे महाराष्ट्रातील अनेक सिंचन योजना पूर्ण झाल्या. यावेळी अजित पवार यांचेही भाषण झाले.

महाराष्ट्रात महायुती ४५ पार करेल – मुख्यमंत्री

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गेले दशक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुवर्णकाळ ठरले. मोदींनी देशाला आत्मनिर्भर करून आत्मसन्मान आणि आत्मविश्वास दिला. जनता आणि मोदी यांचा अतूट जोड तुटणार नाही. तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान होतील आणि देशात ४०० पार तर महाराष्ट्रात महायुती ४५ पार करेल, असा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.