नागपूर : धावत्या गाडीत प्रवाशांना येणाऱ्या अडचणी तातडीने दूर होण्यास मदत मिळावी म्हणून ‘ट्रेन कॅप्टन’ची अतिशय उत्तम संकल्पना राबण्यास प्रारंभ झाला आहे, परंतु रेल्वेतील रिक्त पदांमुळे ‘ट्रेन कॅप्टन’ प्रवाशांना सुविधा देण्यास असमर्थ ठरत असून चांगल्या योजनेचा बोजवारा उडण्याचे चिन्हे आहेत.

रेल्वेने प्रवाशांना सुविधा आणि सुरक्षा प्रदान करण्यासाठी ‘ट्रेन कॅप्टन’ची संकल्पना मांडली आहे. त्यानुसार सेवाज्येष्ठतेनुसार रेल्वे गाडीतील तिकीट तपासणीसांपैकी वरिष्ठाला ‘ट्रेन कॅप्टन’चा दर्जा दिला जातो. त्याचे नाव आणि भ्रमणध्वनी क्रमांक तिकीट आरक्षण तक्तयावर  प्रकाशित केले जाते.

धावत्या गाडीत वीज, पाणी, एसीची अडचण किंवा प्रकृती बिघडली, आरक्षित बर्थवर अन्य बसला असेल तर प्रवाशांच्या मदतीला धाऊन जाणे ट्रेन कॅप्टनची जबाबदारी आहे. ट्रेन कॅप्टनने वाणिज्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून तसेच गाडीतील आरपीएफ, टीटीई, एसी अटेडन्सच्या मदतीने प्रवाशांच्या अडचणी दूर करायच्या आहेत. ही अतिशय चांगली संकल्पना आहे. वास्तविक तिकीट तपासणीस (टीटीई) यांचे प्रवाशांना सुविधा पुरवण्याचे काम आहे, परंतु रेल्वेगाडय़ांची संख्या आणि टीटीईची संख्या यांचे व्यस्त प्रमाण आहे. त्यामुळे अनेकदा प्रवास संपूनही टीटीईचे दर्शन होत नाही, अशी सध्या स्थिती आहे. या परिस्थितीत कॅप्टनला प्रवाशांना हाकेला साद घालणे कठीण झाले आहे. सध्या नागपूर-मुंबई दुरान्तो एक्सप्रेसमध्ये ट्रेन कॅप्टन नियुक्त करण्यात आले आहेत. सेवाग्राम एक्सप्रेस नागपूर-पुणे एक्सप्रेस, नागपूर-पुणे गरीबरथ या गाडय़ांना मनुष्यबळाअभावी कॅप्टन मिळण्यास विलंब होत आहे.

अपुऱ्या मनुष्यबळामुळे अडचण

नागपूर रेल्वेस्थानकावरून दररोज सुमारे १२० गाडय़ांचे आवागमन होते. यापैकी आठ गाडय़ा नागपुरातून सुटतात. यातील केवळ नागपूर-मुंबई दुरान्तो एक्सप्रेसवर आवश्यकतेनुसार तिकीट तपासणीसांची संख्या असते. उर्वरित सर्व गाडय़ांवर दोन किंवा तीन पेक्षा अधिक तिकीट तपासणीस राहत नाही. नऊ वातानुकूलित डब्यांसाठी दोन कंडक्टर, नऊ शयनयान डब्यांसाठी चार तिकीट तपासणीस आवश्यक असतात, परंतु प्रेरणा एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, नागपूर-पुणे, अहिल्याबाई इंदूर एक्सप्रेस या गाडय़ांवर  केवळ एक कंडक्टर आणि एक टीटीई असतो. अशाप्रकारे मनुष्यबळ कमी असल्याने ट्रेन कॅप्टन संकल्पना राबवता येणे अशक्य आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

इतर गाडय़ांमध्ये ट्रेन कॅप्टन

राजधानी एक्स्प्रेसमध्ये गाडी अधीक्षक हे पद आहे. या अधीक्षकाचे काम प्रवाशांना प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणीचे निराकरण करणे आहे. त्याच धर्तीवर राजधानी, शताब्दी, दुरान्तो तसेच इतर एक्स्प्रेस गाडय़ांवर ट्रेन कॅप्टन राहणार आहेत. कॅप्टनला वाणिज्य नियंत्रण कक्ष, आरपीएफ, विद्युत कर्मचारी आणि टीटीईच्या मदतीने प्रवाशांचे समाधान करायचे आहे. दरम्यान, वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक के.के. मिश्रा यांनी दुरान्तो नंतर इतर गाडय़ांमध्ये ट्रेन कॅप्टन सुविधा लवकरच देण्यात येईल, असे सांगितले.