नागपूर : सहकारी पोलीस हवालदाराच्या उच्चशिक्षित मुलीला आर्थिक मदतीचे प्रलोभन दाखवून अश्लील कृत्य करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले. त्याचा न्यायालयाने जामीनही फेटाळला. त्यामुळे त्याला अटक करण्याची तयारी नंदनवन पोलीस करीत असल्याची माहिती आहे. धनंजय सायरे (वय ५६, रा. धामनगाव, अमरावती) असे निलंबित ठाणेदाराचे नाव आहे.

अमरावतीमधील एका तालुक्यात राहणारी पीडित २२ वर्षीय तरुणी अपर्णा (बदललेले नाव) हिचे हवालदार असलेल्या वडिलाचे मित्र धनंजय सायरे याच्याशी मैत्री होती. त्याने अपर्णाला आर्थिक मदत आणि स्पर्धा परीक्षेसाठी सहकार्य करण्याचे आमिष दाखवले होते. ती नागपुरात राहून शिकवणी वर्गाला जात होती. अकोला शहरातील खदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय सायरेने अपर्णाला स्वत:चे न्यूड फोटो पाठवले होते. त्यानंतर तिलाही न्यूड फोटो पाठविण्यासाठी तो धमकी देत होता.

हेही वाचा…लोकजागर: निवडणूक आख्यान – तीन

गेल्या काही दिवसांपासून ती धनंजयचे फोन उचलत नव्हती. त्यामुळे तो शनिवारी नागपुरात आला. त्याने अपर्णाच्या घरी जाऊन पिस्तुलचा धाक दाखवून शारीरिक संबंधाची मागणी केली. तसेच तिच्याशी अश्लील चाळे केले. अपर्णाने नंदनवन ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. अकोल्याचे पोलीस अधीक्षक बच्चनसिंग यांनी ठाणेदार धनंजय सायरे याला निलंबित केले. तसेच बुधवारी न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळला.

धनंजय हा पोलीस खात्याअंतर्गत परीक्षा देऊन शिपायाचा पोलीस अधिकारी झाला. सध्या तो अकोल्यातील खदान पोलीस ठाण्यात ठाणेदार आहे. त्याची वाईट नजर आपल्या हवालदार मित्राची मुलगी अपर्णावर पडली. अपर्णा ही एम. टेकपर्यंत शिक्षण घेतले असून तिला पोलीस अधिकारी व्हायचे आहे. मात्र, सायरेचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. त्यामुळे तो नेहमी तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करीत होता.

हेही वाचा…नवतपाच्या आगमनाला वेळ, पण विदर्भ तापू लागला; सर्वाधिक ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अकोल्यात

विभागीय चौकशी होणार

अपर्णाने शारीरिक संबंधास नकार दिल्यामुळेच चिडलेल्या धनंजय सायरेने तिला पिस्तूल दाखवली. गोळ्या झाडून ठार करण्याची धमकी देऊन तिच्याशी बळजबरी संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने आरडाओरड केल्यामुळे शेजाऱ्यांनी धाव घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ठाणेदार सायरेच्या कृतीमुळे अकोला पोलीस विभागाची प्रतिमा मलीन झाली असून त्याच्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर विभागीय चौकशी करण्यात येत आहे.