एका डॉक्टरचा अहवाल नकारात्मक, आणखी एकात लक्षणे

नागपूर : उपराजधानीत सोमवारी जर्मनीहून ४ तर फ्रान्समधून २ असे एकूण सहा जण पोहोचले. सगळ्यांना खबरदारी म्हणून प्रथमच प्रशासनाने सक्तीने १४ दिवसांसाठी विलगीकरण कक्षात ठेवले आहे. त्यांच्यात या आजाराचे सध्यातरी एकही लक्षण नाही. आज सोमवारी मेडिकलला नेपाळ, रशिया या देशात प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या काही रुग्णांसह इतर असे १३ जण दाखल झाले. येथे अहवाल विलंबाने येण्याच्या कारणावरून संशयित रुग्ण संतप्त होत असल्याने प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे.

केंद्र सरकारच्या सूचनेवरून नागपूरच्या जिल्हा प्रशासनाने विशिष्ट जिल्ह्य़ातून येणाऱ्या रुग्णांना १४ दिवसांच्या सक्तीच्या विलगीकरणात ठेवण्याचे घोषित के ले होते. त्यानुसार आज सहा जणांना वैद्यकीय नमुने घेण्यासाठी शासकीय रुग्णालयात आणले गेले. नमुने घेतल्यावर त्यांना आमदार निवासात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. याला जिल्हा शल्यचिकित्सकांनी दुजोरा दिला. विदेश प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या इतर १३ जणांचे नमुने तपासणीसाठी घेऊन त्यांना विशेष वार्डात ठेवण्यात आले आहे.  मेडिकलच्या या विशेष वार्डात सेवा देणाऱ्या डॉक्टरचा अहवाल नकारात्मक आला.

परंतु मेडिकलच्या या वार्डाशी संबंध नसलेल्या दुसऱ्या एका डॉक्टरने सर्दी, खोकला, तापाची तक्रार करताच अधिकाऱ्यांनी खबरदारी म्हणून त्याला वसतिगृहात वेगळे राहण्याचा सल्ला दिला. या डॉक्टरचे नमुने मंगळवारी तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत.  प्रशासनाच्या माहितीनुसार, सोमवारी शहरात ४४ संशयितांना दाखल करून त्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.  विमानतळावर एकू ण २५ जणांची तपासणी करण्यात आली.  सध्या ९५ व्यक्तींचा १४ दिवसांचा पाठपुरावा सुरू आहे.

संशयित रुग्णांच्या वागणुकीने प्रशासनावर ताण

मेयोतील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेच्या केंद्रात सध्या नमुने तपासण्याला मर्यादा आहे. येथील तंत्रज्ञांसह डॉक्टर दिवसरात्र काम करत आहेत.  एकदा नमुने तपासल्यावर दुसरे नमुने तपासण्यासाठी सुमारे सात तास  लागतात. त्यामुळे  अहवालाला आणखी सात तास लागतात. यामुळे अहवालाच्या प्रतीक्षेतील रुग्ण संतापतात. त्यांचे समुपदेशन करण्यात रुग्णालय प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. काही रुग्ण पळून जाण्याची धमकी देत असल्याने पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला आहे.

खबरदारीसाठी वाचनालयेही बंद

करोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारपासून शहरातील महापालिके च्या अखत्यारित असलेले उत्तर नागपूरचे डॉ. राममनोहर लोहिया वाचनालय, श्रीमती उषाराणी महिला वाचनालय व अध्ययन के ंद्र पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहे. सोमवारी काही विद्यार्थी येथे गेले असता हा प्रकार समोर आला. येथे रोज हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी जातात. त्यामुळे सर्वाची गैरसोय होणार असली तरी खबरदारी म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांने स्वत:च्या घरी राहून संपुर्ण कु टुंबाची काळजी घेत शासनाला करोना प्रतिबंधासाठी मदत करण्याचे आवाहन विद्यार्थी प्रतिनिधी सुबोध चहांदे यांनी के ले.