नागपूर: एसटी महामंडळाने बुधवारी (१ जून) अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त एसटीच्या गणेशपेठ येथील मध्यवर्ती आगारातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खुद्द आगारातील अधिकाऱ्यांनी बसमध्ये पेढे भरवले. यावेळी एसटीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केक कापून आनंद व्यक्त केला.

एसटीला ७४ वर्ष पूर्ण झाले असून बुधवारी महामंडळाने ७५ व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त नागपुरातील गणेशपेठसह इतरही आगारात जनजागृती, स्वच्छता अभियानसह विविध उपक्रम सुरू केले आहेत. गणेशपेठ आगारात कार्यक्रमाअंतर्गत आगार व्यवस्थापक अनिल आमनेरकर आणि इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सकाळी ११ वाजल्यापासून स्वतः विविध बसमध्ये चढून प्रवाशांना पेढे भरावले.

हेही वाचा : “आपण राज्याचं वैभव आहोत याचं भान ठेवा”; उद्धव ठाकरेंचा एसटी कर्मचाऱ्यांना सल्ला

याप्रसंगी एसटी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत असल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली. प्रवाशांनीही याप्रसंगी एसटीला शुभेच्छा देत आजही सुरक्षित प्रवासासाठी एसटीवर विश्वास असल्याचे मत व्यक्त केले. यानंतर आगारात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केक कापून एसटीचा वर्धापन दिन साजरा केला. दरम्यान, नागपुरातील प्रत्येक आगाराला महामंडळाने वर्धापन दिनासह अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी प्रत्येकी ५ हजार रुपये उपलब्ध केले.