* डॉ. अक्षयकुमार काळे यांचे प्रतिपादन
* सुचित्रा कातरकर यांच्या पुस्तकांचे प्रकाशन

आपली भावनानुभूती असते. वेदना ठणकत असतात. त्या विचारुनुभूतीत परावर्तीत व्हायला हव्यात. कवीचा विचार त्या दिशेने व्हायला हवा. तसे झाल्यास भावनानुभूतीला विचारुनुभूतीची जोड मिळते. कवयित्रीने केवळ हायकूवर न थांबता इतर काव्यप्रकारही हाताळावेत, असा सल्ला ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांनी ज्येष्ठ कवयित्री सुचित्रा कातरकर यांना दिला आहे. त्यांच्या ‘तुमबिन तुझ्याविना’ आणि दिवंगत मधुकर कातरकर यांच्यावरील हिंदी-मराठी हायकू संग्रह ‘सांजसावळी’ या दोन पुस्तकांचा प्रकाशन समारंभ वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

‘तुमबिन तुझ्याविना’ या पुस्तकावर बोलताना डॉ. काळे म्हणाले, हायकू आपला प्रकार नसून जपानमधून तो इतरत्र पसरला आहे. कवयित्री कातरकर यांच्या रचना संपूर्ण हायकू नसून हायकूंची माळ आहे. हायकूलाच कवितेत गुंफल्याने त्याला एक वेगळे वैशिष्टय़ प्राप्त झाले आहे. कवयित्रीने केवळ हायकूवर न थांबता इतर काव्यप्रकारांचाही आदमास घ्यावा. ‘सांजसावळी’ या पुस्तकावर ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी यांनी भाष्य केले. यावेळी संगीतकार श्याम देशपांडे आणि ज्येष्ठ निवेदक प्रकाश एदलाबादकर यांचा सत्कार गिरीश गांधी यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक दिलीप कातरकर यांनी केले तर संचालन विजया मारोतकर यांनी केले. अध्यक्षीय भाषणात गांधी यांनी कातरकर यांनी मनमोकळेपणाने ‘पती’वर प्रेम असल्याचे कबूल केल्याचे कौतुक करीत ते वेगवेगळ्या कारणास्तव जन्मभर पती किंवा पत्नीला व्यक्त करता येत नाही. पुढेही चांगली कलाकृती सुचित्रा कातरकर यांच्याकडून घडो, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी दिवंगत मधुकर कातरकर यांच्या व्यक्तित्त्वाचे विविध पैलू यावेळी सांगितले.

आपल्याकडे जसा मामा-भाच्याचा इतिहास चांगला नाही. तसाच अलीकडे काका- पुतण्याचाही इतिहास चांगला नसल्याचे दिसून येते. या पाश्र्वभूमीवर काका दिवं. मधुकर कातरकर आणि त्यांचे पुतणे दिलीप कातरकर यांच्यातील काका-पुतण्याचे नाते मात्र, अपवाद असल्याची राजकीय टिपणी गिरीश गांधी यांनी अध्यक्षीय भाषणात करताच सभागृहात खसखस पिकली.