नागपूर : तंत्रज्ञानाच्या युगात घरोघरी संगणक पोहचले असून तरुणांचा माहिती तंत्रज्ञानाकडे कल वाढला आहे. या पार्श्वभूमीवर देशात संगणक वापरणाऱ्या तसेच माहिती आणि तंत्रज्ञान अवगत असलेल्या कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून त्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी विभागाकडून नियमितपणे वेगवेगळय़ा विषयांवर देशपातळीवर सर्वेक्षण केले जाते. करोनामुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक स्थितीवर झालेल्या परिणामांबाबतही सर्वेक्षण करण्यात आले होते.

आता या ७९ व्या फेरीत देशभरात संगणकाचा वापर करणाऱ्याव माहिती आणि तंत्रज्ञान अवगत असलेल्या कुटुंबांची टक्केवारी किती याची माहिती संकलित केली जाणार आहे. १ जुलै २०२२ ते ३० जून २०२३ या काळात ही माहिती संकलित केली जाईल, असे राष्ट्रीय सांख्यिकी विभागाच्या, नागपूर क्षेत्राचे संचालक श्रीनिवास उप्पला यांनी सांगितले. यासोबतच आयुष उपचारसंबंधी माहिती असलेल्या कुटुंबांची माहिती संकलित केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे, प्रथमच सर्वेक्षणासाठी ‘टॅबलेट’चा वापर केला जाणार आहे. अचूक माहिती संकलित व्हावी हा यामागचा उद्देश असल्याचे अधिकारी सांगतात. सर्वेक्षणाद्वारे संकलित केलेली माहिती केंद्र सरकारकडून तयार करण्यात येणारी सामाजिक, आर्थिक धोरणे तयार करण्यासाठी तसेच विविध योजना आखण्यासाठी सहाय्यक ठरते, हे येथे उल्लेखनीय. दोन वर्षांपूर्वीच हे काम हाती घेण्यात येणार होते. मात्र, करोनामुळे ते रखडले होते. परंतु आता १ जुलैपासून याला सुरुवात होत आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. नागपुरात २० व २१ जून रोजी प्रशिक्षण शिबीर झाले. अचूक माहिती संकलित करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असल्याची माहिती राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, नागपूरचे उप महासंचालक आर.सी. गौतम यांनी दिली.