लोकसत्ता टीम

नागपूर : अंबाझरी तलावावर मित्रांसह फिरायला गेलेल्या तरुणांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. एका युवक मित्रासह पोहत काही अंतरावर गेला. काही मिनिटातच त्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. सूरज हरीहर खंडारे (२२) रा. संघ बिल्डिंग रोड, महाल, असे मृताचे नाव आहे.

सूरज खंडारे हा पदवीधर होता. खासगी संस्थेत काम करीत होता. तो नेहमीच मित्रांसह तलावात पोहण्यासाठी जात होता. बुधवारी सकाळीही सूरज आणि त्याचा मित्र विपूल ओमकार मडके (२०) रा. फ्रेंड्स कॉलनी, हे अंबाझरी तलावात पोहण्यासाठी गेले होते. दोघेही पोहण्यात तरबेज असल्याने पोहत-पोहत बऱ्याच दूर निघून गेले. काही वेळाने दोघेही परत काठाकडे निघाले. काठावर पोहोचल्यानंतर विपूलने मागे पाहिले असता त्याला सूरज दिसला नाही. काही वेळ प्रतीक्षा केल्यानंतरही सूरजचा दिसत नसल्याने विपूल घाबरला. त्याने तत्काळ नियंत्रण कक्षाला माहिती दिली. अंबाझरी पोलीस घटनास्थळावर पोहोचले. अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. जवळपास १०.३० वाजताच्या सुमारास सूरजचा मृतदेह मिळाला.

आणखी वाचा-बुलढाणा : भरधाव स्कॉर्पिओला भीषण अपघात, ३ ठार, ५ जखमी

सूरज मुळचा यवतमाळ येथील रहिवासी आहे. त्याचे आई-वडील शेतमजूर आहेत आणि यवतमाळ येथेच राहतात. सूरज नागपुरात बहिणीकडे राहून पोलीस भरतीची तयारी करीत होता. पोहण्यात तरबेज असतानाही तो बुडाला कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच्या मृत्यूचा कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.