सुपरस्पेशालिटी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी

‘आई’ या दोन शब्दात प्रेम, करुणा, ममता हे सगळे शब्द व्यापलेले असतात. समाजात आजही मुलीच्या तुलनेत मुलाला जास्त महत्त्व दिले जाते. परंतु नागपूरच्या एका मुस्लिम कुटुंबाने मुलीला मुलाइतकेच महत्त्व देऊन स्वकृतीतून समाजापुढे उदाहरण घालून दिले आहे. या कुटुंबातील आईने आपल्या पोटच्या मुलीसाठी किडनी दान करण्यास होकार दिल्याने सुपरस्पेशालिटी रुग्णालयात मंगळवारी पहिली किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली. ही महाराष्ट्रात राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत पहिली शस्त्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियेमुळे आईच्या दातृत्वाने लेकीचा पुनर्जन्म झाल्याची भावना आहे.

मारिया आफरीन शेख (२४) रा. सतरंजीपुरा असे यशस्वी किडनी प्रत्यारोपण झालेल्या मुलीचे तर शहजादी परवीन (४३) असे तिच्या आईचे नाव आहे. मारियाला गेल्या नऊ वर्षांपासून किडनीचा त्रास होता. वेदनांमुळे तिने बारावीतच शिक्षणाला सोडचिठ्ठी दिली. गेल्या दीड वर्षांत डायलेसीससारख्या उपचारांवर ती जगत होती. वडील मैनुद्दीन सिराजुद्दीन (वय- ५०) यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने ते खासगी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाकरिता लागणारा ५ ते १० लाखापर्यंतचा खर्च पेलू शकत नव्हते.

मेडिकलच्या अखत्यारित असलेल्या सुपरस्पेशालिटी या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू झाल्यावर त्यांना प्रशासनासह डॉक्टरांनी राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत मोफत शस्त्रक्रिया शक्य असल्याचे सांगितले.  कुटुंबीयांकडून होकार मिळताच मुलीकरिता आईची किडनी देणे शक्य आहे काय? हे वेगवेगळ्या तपासण्या करून बघितले गेले. त्यापूर्वी विभागीय किडनी प्रत्यारोपण समितीकडून मारियाच्या आईची ‘इन-कॅमेरा’ चौकशी झाली. समितीने होकार दिल्यावर आई व मुलीला सोमवारी सुपरमध्ये शस्त्रक्रियेकरिता दाखल केले गेले. मंगळवारी, ९ फेब्रुवारीला किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रियेची सुपरस्पेशालिटीत नोंद झाली.  साडेतीन तास ही शस्त्रक्रिया चालली. मुलीला बसलवेल्या किडनीचा रंग गुलाबी असल्याचे व त्यात काही क्षणात मूत्र यायला सुरू झाल्याचे बघून ही शस्त्रक्रिया वैद्यकीयदृष्टय़ा यशस्वी झाल्याचे घोषित करण्यात आले. ही माहिती कुटुंबीयांना कळताच त्यांना आनंदाश्रू अनावर झाले होते. मुलीला उपचाराकरिता सुमारे १५ दिवस तर आईला ७ दिवस रुग्णालयात राहावे लागणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. आई व लेकीकरिता पुढील २४ तास महत्त्वाचे असून त्यात काही तांत्रिक अडचण न आल्यास दोघींचीही प्रकृती धोक्याबाहेर राहील, असे डॉक्टरांनी सांगितले.ही शस्त्रक्रिया मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे व सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या मार्गदर्शनात मूत्रशल्यचिकित्सक विभागाचे प्राध्यापक डॉ. संजय कोलते, सहाय्यक प्राध्यापक डॉ. धनंजय सेलोकर, मूत्रपिंड चिकित्साशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. समित चौबे, प्राध्यापक डॉ. चारूलता बावनकुळे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. मनीष बलवानी, डॉ. मेहराज शेख, डॉ. विजय श्रोते यांनी केली. मारिया यांच्या कुटुंबीयांना बाहेरून औषधे आणण्याकरिता सुमारे ५५ ते ६० हजारांचा खर्च आला असून हा सगळा पैसा राजीव गांधी जीवनदायी योजनेतून कुटुंबीयांना परत दिला जाईल. कुटुंबीयांनी मेडिकलसह शासनाचे आभार मानले.

साडेतीन तास शस्त्रक्रिया – डॉ. समीर चौबे

किडनी प्रत्यारोपणाकरिता साधारण ५ तासांचा कालावधी लागतो. परंतु सुपरस्पेशालिटी रुग्णालयात डॉ. अभिमन्यू निसवाडे व डॉ. मनीष श्रीगिरवार यांनी उपलब्ध करून दिलेले आवश्यक कर्मचारी व साधनांमुळे केवळ साडेतीन तासात ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. शस्त्रक्रिया झालेल्या आई व लेकीवर डॉक्टरांचे पूर्ण लक्ष आहे.

प्रत्यारोपण वाढवणार – डॉ. अभिमन्यू निसवाडे

सुपरस्पेशालिटी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने गरिबांसह मध्यमवर्गीय रुग्णांना यशस्वी उपचार मोफत वा अल्पदरात उपलब्ध झाले आहेत. ट्रामा केयर युनिट सुरू झाल्यावर येथे ‘ब्रेन डेड’ रुग्ण उपचाराकरिता आढळल्यास त्यांच्या नातेवाईकांना किडनी प्रत्यारोपणाकरिता प्रोत्साहित केले जाईल. या प्रकारे उपलब्ध झालेल्या किडनीतून प्रत्यारोपण वाढवण्याचा प्रयत्न असून ते झाल्यावरच या केंद्राला खऱ्या अर्थाने महत्त्व येईल, असे मत मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी व्यक्त केले.