नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांनी रखडलेला नागपूर ते नागभीड रेल्वेमार्गातील अडथळा अखेर दूर झाला आहे. उमरेड-पवनी-करांडला अभयारण्यातून जात असलेल्या या रेल्वेमार्गाला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने मान्यता दिल्याने नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा रेल्वेमार्ग पुढील सहा महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे.

नागपूर (इतवारी) ते नागभीड या १०६.२ किलोमीटर नॅरोगेज रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यात येत आहे. नागपूर ते उमरेडपर्यंतचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु, उमरेड ते नागभीड या दरम्यानचे काम ठप्प आहे. यापैकी १६ किलोमीटरचा रेल्वेमार्ग उमरेड-पवनी-करांडला अभयारण्यातून जात आहे. त्यामुळे या रेल्वेमार्गाच्या मान्यतेसाठी प्रारंभी राज्य वन्यजीव मंडळ आणि भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडून यांच्या कसोटीतून जावे लागले. त्यानंतर राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने पाच महिन्यांपासून निर्णय घेतला नाही. यासंदर्भात ‘लोकसत्ता’ने २१ जानेवारी २०२४ रोजी वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर ७ फेब्रुवारी २०२४ रोजी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय चर्चेला घेण्यात आला. त्यात उपशमन योजनांच्या सूचनेसह रेल्वेमार्गाला मान्यता देण्यात आली. या मार्गावरील तीन ठिकाणे अतिशय संवेदनशील आहेत. तेथे वन्यप्राण्यांच्या भ्रमणासाठी सात भुयारी मार्ग (अंडरपास) उभारण्याची सूचना करण्यात आली आहे. त्या भुयारी मार्गाची सरासरी लांबी १८८ मीटर ते ७७० मीटर एवढी ठेवावी लागणार आहे. तसेच विद्यमान २२ रेल्वे क्रॉसिंग आणि पूल उभारावे लागणार आहे. वन्यप्राण्यांच्या भ्रमणासाठी त्यांच्या आकार २.६५३ मीटर ते ५ मीटर असावे, असे बंधन आहे.

हेही वाचा – सेल्फीस नकार देत पालकाने मुख्यमंत्र्यांना केला थेट सवाल; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

हेही वाचा – निवृत्त न्यायाधीश २० हजारांत भरणपोषण कसे करणार? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र शासनाला सवाल

भारतीय रेल्वे आणि राज्य सरकारच्या सहभागातून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (महारेल) हे काम करीत आहे. या रेल्वेमार्गाचे डिसेंबर २०१९ पासून काम सुरू झाले. २० महिन्यात ब्रॉडगेजचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. परंतु, करोनामुळे आणि वन्यजीव मंडळाच्या मंजुरीविना प्रकल्पाचे काम अडकले होते. याबाबत महारेलचे अधिकारी म्हणाले, राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मान्यता मिळाली आहे. नागपूर (इतवारी)-उमरेड ५० किलोमीटरचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण होईल. उर्वरित उमरेड ते नागभीड ५६ किलोमीटरचे काम जुलै-ऑगस्ट २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मान्यता मिळाली आहे. पुढील सहा महिन्यांत हे काम पूर्ण केले जाईल, असे महारेलचे समूह महाव्यवस्थापक डी.आर. टेंभुर्णे यांनी सांगितले.